ब्रिटनपाठोपाठ आणखीन एका मोठ्या राजघराण्यातील सदस्यांना करोना विषाणूच्या संसर्गाचा फटका बसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सौदी अरेबियाच्या राजघराण्यातील १५० सदस्यांवर करोनाचा संसर्ग झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सौदीचे राजे  मोहम्मद बिन सलमान करोनापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी विलगीकरणामध्ये (आयसोलेशन) गेले आहेत.

न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार मागील एका आठवड्यामध्ये सौदी अरेबियातील राजघराण्यातील १५० जणांना करोनाचा संसर्ग झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे. सौदीचे राजे फैसल बिन अब्दुल अजीज अल सऊद यांना अतीदक्षता विभागात दाखल करण्यात आला आहे. ७० वर्षांचे फैसल हे रियाद प्रदेशाचे राज्यपाल आहेत. शाही कुटुंबातील सदस्य वरचेवर युरोपीय देशांचे दौरे करत असतात. याच यात्रेदरम्यान राजघराण्यापर्यंत करोनाचा संसर्ग पोहचल्याचे सांगितले जात आहे.

किंग फैसल यांच्यावर शाही कुटुंबाचे डॉक्टर उपचार करत आहेत. किंग फैसल स्पेशलिस्ट रुग्णालयामध्ये ५०० अतिरिक्त बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. देशामध्ये करोनाचा धोका वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण देशातून येणाऱ्या व्हिआयपी रुग्णांसाठी खास व्यवस्था तयार केली जात आहे.

किती लोकांवर आम्हाला उपचार करावा लागेल याचा आत्ताच अंदाज बांधता येणार नाही. मात्र आम्हाला पूर्णपणे तयार रहायला हवं असं मत डॉक्टरांनी व्यक्त केलं आहे. रुग्णालयातील एखाद्या कर्मचाऱ्याला संसर्ग झाल्यास त्याला दुसऱ्या रुग्णालयामध्ये दाखल केलं जाईल. राजघराण्यातील व्यक्तींवर उपचार करता कोणतीही अडचण येणार नाही तसेच खोल्या कमी पडणार नाहीत याची आम्ही काळजी घेत असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केलं.

गुरुवारपर्यंत करोनामुळे जगभरामध्ये ९५ हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर एएफपीने ही आकडेवारी जारी केली आहे. जगभरातील १९२ देशांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. १६ लाखाहून अधिक जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. तर या आजारातून बरं झालेल्या लोकांची संख्या तीन लाख ५३ हजारहून अधिक आहे.