07 March 2021

News Flash

१ जूनपासून लॉकडाउनचा पाचवा टप्पा? अमित शाह यांनी केली मुख्यमंत्र्यांशी चर्चा

३१ मे नंतर लॉकडाउन वाढवायचा की नाही ? अमित शाह यांनी जाणून घेतलं मुख्यमंत्र्यांचं मत

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह. (संग्रहित छायाचित्र)

करोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनचा चौथा टप्पा ३१ मे रोजी संपत आहे. देशात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात अद्याप यश मिळालं नसल्याने लॉकडाउन पुढे वाढवायचा की नाही यासंबंधी लवकरच केंद्र सरकार घोषणा करणं अपेक्षित आहे. पण त्याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशभरातील लॉकडाउनसंबंधी अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचं मत जाणून घेतलं. पीटीआयने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, अमित शाह यांनी लॉकडाउन पुढे वाढवण्यासंबंधी मुख्यमंत्र्यांचं काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी फोनवरुन त्यांच्याशी चर्चा केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्च रोजी पहिल्या लॉकडाउनची घोषणी केली होती. २१ दिवसांसाठी हा लॉकडाउन घोषित करण्यात आला होता. सुरुवातीला हा लॉकडाउन ३ मे आणि त्यानंतर १७ मे पर्यंत वाढवण्यात आला. चौथ्या टप्प्यात लॉकडाउन ३१ मे पर्यंत वाढवण्यात आला. लॉकडाउनचा चौथा टप्पाही ३१ मे रोजी संपत असून त्यामध्ये वाढ करायची की नाही किंवा निर्बंध शिथील करायचे यासंबंधी केंद्र सरकार चर्चा करत आहे. याचाच भाग म्हणून अमित शाह यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली आहे.

मुख्यमंत्र्यांशी बोलताना अमित शाह यांनी राज्यांमध्ये चिंता वाटणारी ठिकाणे तसंच १ जूनपासून सुरु केली जाऊ शकतात अशी कोणती क्षेत्रं आहेत यासंबंधी माहिती जाणून घेतली असं अधिकाऱ्याने सांगितलं आहे. महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेण्याआधी दरवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली आहे. अमित शाह यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. पण नरेंद्र मोदी यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग बैठकीत अमित शाह नेहमी हजर असायचे.

बैठकीतील सविस्तर माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. पण मिळालेल्या माहितीनुसार, अनेकांनी सर्वसामान्य जीवन सुरळीत व्हावं तसंच अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी काही निर्बंध शिथील करत लॉकडाउन सुरु ठेवावा असं मत व्यक्त केल्याचं अधिकाऱ्याने सांगितलं आहे. केंद्र सरकार पुढील तीन दिवसात लॉकडाउनसंबंधी निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 29, 2020 7:50 am

Web Title: coronavirus home minister amit shah speaks to cms seeks views on extension of lockdown sgy 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 भारत चीन सीमा वाद : मोदी चांगल्या मूडमध्ये नाहीत – डोनाल्ड ट्रम्प
2 सलग ७ व्या दिवशी सहा हजार नवे रुग्ण
3 जगभरात ४ लसींवरील संशोधन लक्षवेधक
Just Now!
X