ब्रिटनमधून गुजरातमध्ये परत आलेल्या चार जणांना नवकरोनाचा संसर्ग झाल्याचे चाचण्यांत दिसून आले आहे, असे राज्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

ब्रिटनमधून अहमदाबादेत परतलेल्या १५ सकारात्मक रुग्णांचे नमुने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे पाठवण्यात आले होते. त्यात चार जणांना नवकरोनाचा संसर्ग असल्याचे स्पष्ट झाले आहे. ब्रिटनमधून अहमदाबाद येथे आलेल्या रुग्णांची तपासणी केली असता त्यात १५ जणांना करोना संसर्ग असल्याचे आधीच निष्पन्न झाले होते पण त्यांना नवकरोनाचा संसर्ग आहे की नाही हे तपासणे बाकी होते. त्यासाठी हे नमुने पुण्याच्या एनआयव्हीकडे पाठवण्यात आले होते. त्यात चार जणांना नवकरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले, असे आरोग्य खात्याच्या मुख्य सचिव जयंती रवी यांनी म्हटले आहे. या चार जणांना अहमदाबादच्या सरदार पटेल रुग्णालयात वेगळे ठेवण्यात आले आहे. पंधरा नमुन्यांबाबतचे निष्कर्ष एनआयव्हीकडे बाकी होते, त्यातील काहींचे निकाल अजून यायचे आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.

चेन्नईत बडय़ा हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना लागण

चेन्नईनजीकच्या गिंडी येथील आयटीसी ग्रँट चोला हॉटेलच्या कर्मचाऱ्यांसह ८५ लोकांना गेल्या पंधरवडय़ात करोनाची लागण झाली. आयआयटी मद्रासमध्ये गेल्या महिन्यात २०० विद्यार्थ्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर हे आलिशान हॉटेल करोनाचा नवा ‘हॉटस्पॉट’ ठरला आहे. ‘१५ डिसेंबरला एका कर्मचाऱ्याची चाचणी होकारात्मक आली होती. आतापर्यंत चाचणीसाठी एकूण ६०९ नमुने घेण्यात आले असून त्यापैकी ८५ होकारात्मक आले आहेत.