करोनामुळे देशात लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करणारी क्षेत्र सोडल्यास सर्व व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे असंघटित क्षेत्रातील कामगारांसह शेतकरीही अडचणीत आला आहे. देशातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. देशातील ८ कोटी ७० लाख शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीनं दोन हजार रुपये जमा केले जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी याची माहिती दिली.

करोनामुळे देशातील असंघटित, हातावर पोट असणारा, वयोवृद्ध आणि इतर क्षेत्रातील लोकांच्या उदरर्निवाहाचा प्रश्न उपस्थित झाला होता. सरकारनं तातडीनं मदत द्यावी, अशी मागणी काँग्रेससह सर्वच पक्षांनी केली होती. यासंदर्भात केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं घेतलेल्या निर्णयांची केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी माहिती दिली. यात देशातील शेतकऱ्यांनाही दिलासा देण्यात आला आहे.

आणखी वाचा- आशा वर्कर, डॉक्टर, कर्मचाऱ्यांना ५० लाखांचं विमा संरक्षण

सीतारामन म्हणाल्या की, ‘देशातील इतर घटकांप्रमाणेच शेतकऱ्यांच्या संदर्भातही सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. देशातील ८ कोटी ७० लाख शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत केली जाणार आहे. या योजनेतून सरकारनं शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये देण्याची तरतूद केली आहे. त्यातून पहिला हप्ता दोन हजार रुपये तातडीनं शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत,’ अशी माहिती सीतारामन यांनी दिली.

आणखी वाचा- गरिबांना तीन महिने गहू, तांदूळ, डाळीचे मोफत वाटप होणार – सीतारामन

१ लाख ७० हजार कोटींचे पॅकेज-

देशातील गोरगरीबांसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत १ लाख ७० हजार कोटींचे पॅकेज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलं आहे. करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेला लॉकडाउनचा निर्णय योग्यच आहे. मात्र या कालावधीत हातावर पोट असणाऱ्यांचे हाल होत आहेत. त्यांना दिलासा देण्यासाठी या पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे.