देशात लॉकडाउन लागू केल्यानंतर कामानिमित्त घरापासून दूर असलेले कामगार अडकून पडले. त्याचबरोबर जे आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत आणि हातावर पोट भरतात, अशा लोकांसमोर मोठं संकट उभं राहिलं. त्यामुळे दिल्लीत राहणाऱ्या बहुसंख्य लोकांना गावाकडं स्थलांतर सुरू केलं आहे. करोनाचा संसर्गाच्या दृष्टीनं हे अत्यंत घातक असून, याला रोखण्यासाठी दिल्ली सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्यांना घरभाडं भरणं अशक्य आहे, अशा लोकांचं भाडं दिल्ली सरकार भरणार आहे.

१५ मार्चनंतर देशात करोनाचा प्रादुर्भाव वेगानं वाढला. त्यामुळे तातडीचं पाऊल म्हणून केंद्र सरकारनं देशात लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याची घोषणा केली. त्याचबरोबर २१ दिवसांच्या लॉकडाउनच्या काळात देशावासियांनी जिथे असाल तिथेच थांबावं असं आवाहनही मोदी यांनी केलं होतं. मात्र, लॉकडाउन लागू झाल्यानंतर देशभरातील अनेक भागात लोक स्थलांतर करत असल्याचं समोर आलं. विशेषतः दिल्लीत कामानिमित्त गेलेल्या बिहार आणि उत्तर प्रदेशातील कामगारांनी घराचे रस्ते धरल्यानं चिंता व्यक्त केली जात होती.

दिल्लीतून इतर भागात जाणाऱ्या नागरिकांमुळे करोनाचा फैलाव वाढू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केलेल्या मन की बात कार्यक्रमात याविषयी चिंता व्यक्त केली. त्यानंतर स्थलांतराचा हा प्रश्न गंभीर असल्याचं दिल्ली सरकारच्या लक्षात आलं. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याविषयी चिंता व्यक्त करत कुठेही न जाण्याच आवाहन केलं. त्याचबरोबर ज्यांना घरभाडे देणं परवडणार नाही, त्यांचं घरभाडं दिल्ली सरकार भरेल, अशी घोषणाही केली. त्यामुळे दिल्लीत वास्तव्याला असलेल्या आणि हातावर पोट भरणाऱ्या कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील जनतेशी रविवारी संवाद साधला. यावेळी त्यांनी दिल्ली सरकारकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. नागरिकांनी घाबरून जाण्याचं कारण नाही. फक्त बाहेर पडणं टाळावं, असंही ते म्हणाले.