देशाबरोबरच राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. राज्यात सोमवारी सकाळी १२ जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं. यात सर्वाधिक रुग्ण पुण्यातील आहेत. दरम्यान, पुण्यात करोनामुळे एकाचा मृत्यू झाल्याची घटना आज घडली. राज्यात पहिला करोनाग्रस्त रुग्ण पुण्यात सापडला होता. मात्र, आतापर्यंत एकाही मृत्यूची नोंद झाली नव्हती. दुर्दैवानं सोमवारी एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

old lady dies with 5-year-old grandson in tanker accident
टँकर अपघातात ५ वर्षीय नातवासह आजीचा मृत्यू
Fire at Shop in Chhatrapati SambahjiNagar
छत्रपती संभाजीनगरमध्ये कापड दुकानाला भीषण आग, एकाच कुटुंबातल्या सात जणांचा मृत्यू
Punjab Girl, 10, Dies After Eating Cake Ordered Online On Her Birthday
वाढदिवसाला ऑनलाईन मागवलेला केक खाल्ल्याने दहा वर्षांच्या मुलीचा मृत्यू, कुठे घडली घटना?
death of Uttar Pradesh gangster Mukhtar Ansari
अन्सारीच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी, उपचारादरम्यान मृत्यू; तुरुंगात विषप्रयोग केल्याचा कुटुंबीयांचा आरोप

Live Blog

21:25 (IST)30 Mar 2020
पुणे शहर तीन दिवस पूर्णपणे लॉक डाऊन राहणार ही अफवा : रवींद्र शिसवे

पुणे शहर पुढील तीन दिवस पूर्णपणे लॉकडाऊन करणार असल्याच्या आयशयाची एक व्हिडीओ क्लिप, सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नसून नागरिकांनी कुठल्याही खोट्या माहितीवर विश्वास ठेवू नये. आपल्या शहरातील जीवनावश्यक वस्तुंची दुकाने चालूच राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असं पुणे पोलिस सह आयुक्त रवींद्र शिसवे यांनी सांगितलं आहे.

21:04 (IST)30 Mar 2020
पुण्यात दिवसभरात आढळले तीन रुग्ण

पुण्यात आज (सोमवार) तीन करोना बाधित रुग्ण आढळले. यामुळे शहरातील करोना बाधिताचा आकडा 31 झाला आहे. आतापर्यंत  7 जणांना उपचारानंतर घरी पाठविण्यात आले आहे. तर आज एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

20:19 (IST)30 Mar 2020
रिलायन्स इंडस्ट्रीजकडून ५०० कोटींची आर्थिक मदत जाहीर

करोना व्हायरसच्या संकटाचा सामना करण्यासाठी सर्वसामान्यांबरोबर देशभरातील उद्योगपती आपल्यापरीने मदतीचा हात पुढे करत आहेत. टाटा ग्रुपने १५०० कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केल्यानंतर आता मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने मदत जाहीर केली आहे. सविस्तर बातमी वाचा.

20:07 (IST)30 Mar 2020
महाराष्ट्रात १७ नवे रुग्ण, करोनाग्रस्तांची संख्या २२०

महाराष्ट्रात ३९ करोनाग्रस्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर नवे १७ रुग्ण आढळल्याने रुग्णसंख्या २२० वर पोहचली आहे अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. नव्या रुग्णांमध्ये ८ रुग्ण मुंबईतले, ५ पुण्याचे तर नाशिक आणि कोल्हापूर या ठिकाणी प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे असंही टोपे यांनी स्पष्ट केलं. सध्या राज्यात १७१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज राज्यात दोन करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. ७८ वर्षीय रुग्णाचा मुंबईत तर ५२ वर्षीय रुग्णाचा पुण्यात मृत्यू झाला असंही त्यांनी स्पष्ट केलं.

19:05 (IST)30 Mar 2020
करोना रूग्णाच्या अंत्यसंस्काराला ५ पेक्षा जास्त लोकांना नसेल परवानगी

करोनाची बाधा होऊन एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाला तर अंत्यसंस्कार करण्यासाठी ५ पेक्षा जास्त लोक नकोत असे आदेश मुंबई महापालिकेने दिले आहेत. यासंबंधीचं एक पत्रकच जारी करण्यात आलं आहे. त्या पत्रकात हे आदेश देण्यात आले आहेत. 

18:33 (IST)30 Mar 2020
करोनावर या दोन औषधांचे कॉम्बिनेशन प्रभावी

जगातील अनेक देशांचा आज करोना व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी संघर्ष सुरु आहे. करोना व्हायरसला रोखू शकणारे प्रभावी औषध बनवण्यासाठी जगातील प्रमुख देशांमध्ये मोठया प्रमाणावर संशोधन सुरु आहे. वाचा सविस्तर बातमी.

18:07 (IST)30 Mar 2020
न्यू यॉर्क सरकारचा नागरिकांना हस्तमैथुनाचा सल्ला

जगातल्या बहुतांश देशांमध्ये करोना व्हायरसमुळे लॉकडाउन आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, कंपन्या, कार्यालये बंद असल्यामुळे सर्वचजण घरामध्ये आहेत. ज्यांना शक्य आहे, ते घरामधूनच वर्कफ्रॉम होम करत आहेत. पण ज्यांच्याकडे असा पर्याय उपलब्ध नाही, त्यांना सुट्टीचे पहिले दोन-तीन दिवस संपल्यानंतर आता घरी बसून कंटाळा येऊ लागला आहे. लोकांना वेळेचा सदुपयोग कसा करता येईल, यासाठी टीव्हीवरुन काही कार्यक्रमही दाखवले जात आहेत. सविस्तर बातमी वाचा.

17:39 (IST)30 Mar 2020
मोदी सरकारचा मोठा निर्णय: वाहन कंपन्यांना व्हेंटिलेटर्स तयार करण्याचे निर्देश

सध्या देशात करोनाचा फैलाव रोखण्याचा केंद्र सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. याचाच भाग म्हणून सरकारकडून वाहनांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना आपल्याकडे असणाऱ्या सुविधांचा फायदा व्हेंटिलेटर्स तयार करण्यासाठी करावा असे निर्देश दिले आहेत. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) पुढील आठवड्यापासून एन-९५ मास्कच्या निर्मितीला सुरुवात करणार आहे. डीआरडीओचं दिवसाला २० हजार मास्क तयार करण्यात लक्ष्य आहे.

17:11 (IST)30 Mar 2020
"सरकारने मदत केली नाही तर सहा महिन्यात ३० टक्के रिटेल दुकानं होतील बंद"

सरकारने मदत केली नाही तर सहा महिन्यात ३० टक्के दुकानं बंद होतील असं वक्तव्य रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे सीईओ राजगोपालन यांनी केलं आहे. घाऊक आणि किरकोळ विक्री करणाऱ्यांपैकी किरकोळ विक्री करणाऱ्यांवर फेब्रुवारीपासूनच संकट आलं आहे. अशात आता करोनाच्या संकटामुळे किरकोळ व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांवर टाच येण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात हा कारभार ६० टक्क्यांपर्यंत होता. आता मार्चमध्ये हा कारभारातली उलाढाल शून्यावर आली आहे. त्यामुळेच ही शक्यता वर्तवण्यात आली आहे.

16:11 (IST)30 Mar 2020
Coronavirus : अंत्यसंस्कारांकडे कुटुंबीयांनी फिरवली पाठ, आरोग्य कर्मचाऱ्यांनी केले हे ही काम

हैदराबादमध्ये एका रुग्णाचा करोनामुळे मृत्यू झाला. तेलंगणमधला हा पहिला मृत्यू होता. ७४ वर्षीय करोनाग्रस्त रुग्णाचा अंत उपचारादरम्यान झाला. मात्र त्याच्या अंत्यसंस्काराकडे त्याच्या कुटुंबीयांनी पाठ फिरवली. अखेर आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनीच या ७४ वर्षीय करोनाग्रस्त रुग्णाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.

15:35 (IST)30 Mar 2020
मुंबईत सॅनिटायझरचा साठा करणारी टोळी पकडली; लाखो रुपयांचा माल जप्त

सध्या करोना विषाणूपासून बाचावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात हँड सॅनिटायझरची मागणी प्रचंड वाढली आहे. अशा काळात लाखो रुपयांच्या सॅनिटायझरच्या बाटल्यांचा साठा मुंबई पोलिसांनी पकडला आहे. चारकोप पोलिसांनी रविवारी ही धडक कारवाई केली आहे. यामध्ये दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

14:57 (IST)30 Mar 2020
ठाकरे सरकारचा ७० हजार स्थलांतरित कामगारांना दिलासा, घेतला हा निर्णय

ठाकरे सरकारने ७० हजार पेक्षा जास्त स्थलांतरित कामगारांना दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. या सगळ्यांसाठी २६२ निवारा केंद्रं उभारण्यात आली आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. महाराष्ट्रात २६२ निवारा केंद्र उभारण्यात आली आहेत. यामध्ये स्थलांतरिक कामगार, बेघर लोक राहू शकतात. त्यांच्या जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे असंही उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

14:02 (IST)30 Mar 2020
मुंबईमधील वरळी कोळीवाडा परिसर पोलिसांकडून सील

करोना व्हायरसचे संशयित रुग्ण आढळल्याने मुंबईतील वरळी कोळीवाडा परिसर मुंबई पोलिसांकडून सील करण्यात आला आहे. वरळीमधील कोळीवाड्यात करोनाचे चार संशयित रुग्ण आढळले असल्याने मुबंई पोलिसांनी प्रादुर्भाव रोखण्यासाठी परिसर सील केला आहे. पोलिसांकडून याठिकाणी त्यासंबंधी उद्घोषणा केली जात असून करोनाचे संशयित रुग्ण आढळले असल्याचं सांगण्यात येत आहे. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून परिसराचं निर्जुंतुकीकरण सुरु आहे. पोलिसांनी परिसरात बॅरिकेट्स उभारले असून कोणालाही बाहेर येण्यास किंवा आतमध्ये जाण्यास मज्जाव करण्यात येत आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंक

14:01 (IST)30 Mar 2020
गावी जाण्याचा प्रयत्न जीवावर बेतला, मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू

करोनाच्या भीतीने अनेकजण आपला जीव धोक्यात घालून गावाच्या दिशेने निघाले आहेत. करोनामुळे देशभरात लॉकडाउन जाहीर झाल्याने लोकांच्या घराबाहेर पडण्यावर निर्बंध आले आहेत. मात्र अशा परिस्थितीतही अनेकजण जीव धोक्यात घालून आपल्या खासगी गाडीने आपल्या गावी जाण्यासाठी निघाले आहेत. अशाच पद्धतीने गावी निघालेल्या एका कुटुंबाचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंक

13:58 (IST)30 Mar 2020
पुण्यात करोनाचा पहिला बळी

पुण्यामध्ये करोनामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. करोनामुळे पुण्यात झालेला हा पहिलाच मृत्यू आहे. ५२ वर्षीय व्यक्तीवर शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्या व्यक्तीचा सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. महापालिकेच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली आहे.

13:41 (IST)30 Mar 2020
प्रिन्स हॅरी, मेगनच्या सुरक्षेचा खर्च अमेरिका उचलणार नाही


बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रिन्स हॅरी आणि त्याची पत्नी मेगन यांच्या अमेरिकेतील वास्तव्यासंबंधी एक वक्तव्य केले आहे. वाचा सविस्तर बातमी

13:39 (IST)30 Mar 2020
रयत शिक्षण संस्थेकडून करोना लढ्यासाठी दोन कोटी

करोना विषाणू संसर्गाविरोधात लढण्याकामी सरकारला हातभार लावण्यासाठी रयत शिक्षण संस्थेकडून दोन कोटींचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिला जाणार असल्याची घोषणा संस्थेचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केली आहे. करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून रयत शिक्षण संस्थेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन एकत्रित करून सुमारे दोन कोटींचा निधी धनादेशाद्वारे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्याचा निर्णय एकमुखाने घेतला असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले आहे.

12:54 (IST)30 Mar 2020
मला नेण्यासाठी येता का ? चालताना प्राण गमावण्यापूर्वी त्याने कुटुंबाला विचारला शेवटचा प्रश्न

करोनामुळे संपूर्ण देशभरात लॉकडाउन घोषित झाला आणि अनेक कामगार आपल्या घराच्या दिशेने चालू लागले. वाहतुकीचं कोणतंही साधन उपलब्ध नसल्याने अनेकांनी चालत जाण्याचा निर्णय घेतला. ३०० ते ५०० किमी अंतर चालत पार करत आपल्या घऱी सुखरुप पोहोचण्यासाठी अनेकांची धडपड सुरु आहे. पण यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. अशीच एक ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. ३८ वर्षीय रणवीस सिंह मध्य प्रदेशातील आपल्या घरी पोहोचण्यासाठी चालत निघाले होते. पण रस्त्यातच आग्रा येथे ह्रदयविकाराच झटका आला आणि त्यांना आपले प्राण गमवावे लागले. आपल्या कुटुंबाशी त्यांचं शेवटचं बोलणं झालं तेव्हा त्यांच्या तोंडी वाक्य होतं, "शक्य असेल तर मला घेऊन जाण्यासाठी या". सविस्तर बातमी वाचण्यासाठी 

10:35 (IST)30 Mar 2020
सिलिंडरचा मुबलक साठा उपलब्ध

करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेनंतर अनेक लोकांनी सिलिंडरसाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं होतं. तर काही ठिकाणी सिलिंडरसाठी लोकांच्या मोठ्या रांगा पाहायला मिळाल्या होत्या. दरम्यान, ग्राहकांनी कोणतीही भीती बाळगून सिलिंडर बूक करू नये. आपल्याकडे सिलिंडर योग्य प्रमाणात उपलब्ध आहे, असं इंडियन ऑईलकडून सांगण्यात आलं आहे.

घाबरून जाऊन सिलिंडर बुक करण्याची गरज नाही; इंडियन ऑईलनं केली भीती दूर

10:05 (IST)30 Mar 2020
अफवांवर विश्वास ठेवू नका; लॉकडाऊन वाढवण्याचा विचार नाही – कॅबिनेट सचिव

देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशातील लॉकडाऊनचा कालावधी आणखी वाढवण्यात येणार असल्याच्या सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहेत. मात्र, चर्चा केवळ अफवा असून त्यावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. केंद्र सरकारचा लॉकडाऊन वाढवण्याचा कोणताही विचार नाही, असे स्पष्टीकरण कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी दिले आहे.

09:56 (IST)30 Mar 2020
पुण्यात आणखी पाच करोनाग्रस्त

राज्यातील करोना बाधितांचा आकडा सोमवारी आणखी वाढला आहे. राज्यात आणखी १२ करोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत. यात सर्वाधिक पुण्यातील आहेत. त्यापाठोपाठ मुंबईत तीन, नागपूरमधील दोन आणि कोल्हापूर व नाशिकमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.

09:53 (IST)30 Mar 2020
Coronavirus : कलाकार धावले मदतीला; रंगमंच कामगार संघटनेच्या सहाय्याने करतायेत अशी मदत

सध्या संपूर्ण जग करोना विषाणूच्या सावटाखाली आहे. चीनमधील वुहान शहरातून फैलाव झालेल्या या विषाणूने जवळपास ९० पेक्षा जास्त देशांमध्ये पाय पसरवले आहेत. या भारताचाही समावेश आहे. त्यामुळे या विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी २१ दिवस लॉकडाउन करण्याची घोषणा केली.   या लॉकडाउनच्या काळात अत्यावश्यक सेवा सोडल्या तर सारं काही बंद ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. यासाठी अनेक सामाजिक संस्था आणि सेलिब्रिटींनी गरजूंसाठी मदत करत आहेत. यामध्येच रंगमंच कामगार संघटना आणि काही कलाकार मंडळींनी त्यांच्या मदतीचा हात पुढे केला आहे. पुढे वाचा ...

09:49 (IST)30 Mar 2020
Lockdown: दिलदार ‘भाईजान’; २५ हजार कामागारांना करणार आर्थिक मदत

करोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात २१ दिवस लॉकडाउन करण्यात आला आहे. सध्या या लॉकडाउनच्या काळात अत्यावश्यक सेवा सोडल्या तर सारं काही बंद ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे सध्या कलाविश्वातही बंदचं वातावरण असून या बंदचा परिणाम रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांवर होत आहे. कलाविश्वात अनेक कामगार आहेत जे रोजंदारीवर काम करतायेत. परंतु सध्या सर्वत्र कामकाज बंद असल्यामुळे या कामगारांना आर्थिक संकटांना समोरं जाव लागत आहे. त्यामुळेच अभिनेता सलमान खान याने मदतीचा हात पुढे केला आहे. त्याने आर्थिक संकटात सापडलेल्या  २५ हजार कामगारांना मदत करण्याचा निर्धार केला आहे. पुढे वाचा ...

09:10 (IST)30 Mar 2020
परदेशातून आल्याची माहिती लपवली

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहराजवळील भोस्ते येथील एकाच कुटुंबातील ७ संशयितांना करोना सदृश्य लक्षणं दिसून आल्यानं कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. जिल्ह्यातील करोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रशासन वेगवेगळे खबरदारीचे उपाय करीत असूनही हे संशयित आढळून आल्याने जिल्हा प्रशासन हादरून गेले आहे. -सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

08:32 (IST)30 Mar 2020
अडीच हजार कामगार परतले घरी

करोनामुळे अचानक लॉकडाउन लागू करण्यात आला. त्यामुळे कामानिमित्त घराबाहेर आणि राज्याबाहेर असलेले अनेक कामगार होते त्या ठिकाणीच अडकून पडले. महाराष्ट्रात राज्याच्या सीमा बंद करण्याबरोबरच जिल्ह्याच्या सीमाही बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे लपूनछपून अनेक जण घरी जात असल्याचं दिसून आलं. दरम्यान, कर्नाटकातील दोन हजार ४४२ कामगार मुंबईत अडकले होते. ते अखेर घरी परतले आहते. कर्नाटक सरकारनं पाठवलेल्या बसेसमधून कामगारांना घरी सोडण्यात आलं.

08:16 (IST)30 Mar 2020
... अन्यथा कारवाई, तुकाराम मुंढेचा खासगी वैद्यकीय सेवा देणाऱ्यांना इशारा

करोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउ घोषित करण्यात आले आहे. तसंच देशात आणि राज्यात करोनाग्रस्तांचा आकडाही वाढत आहे. या परिस्थिती खासगी वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्यांनी सेवा देणं बंद केल्याच्या काही तक्रारी समोर आल्या होत्या. याव्यतिरिक्त आरोग्यमंत्र्यांनीदेखील अशा परिस्थितीत खासगी डॉक्टरांनी असंवेदनशीलता दाखवू नये असं म्हटलं होतं, त्यानंतर आता नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. लॉकडाउन दरम्यान कोणतीही खासगी वैद्यकीय सेवा बंद ठेवू नये, असे आदेश त्यांनी दिले आहेत, असं केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

सविस्तर वाचा

08:14 (IST)30 Mar 2020
मुंबईत उतरलेल्या १२०० प्रवासी संपर्काबाहेर

सध्या करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची सर्वाधिक संख्या मुंबईत आहे. त्याचबरोबर मृत्यू झालेल्यांची संख्याही मुंबईत सर्वाधिक आहे. असं चिंतेच वातावरण असताना एक धक्कादायक माहिती समोर आली. २२ मार्च रोजी परदेशातून मुंबईत परतलेल्या प्रवाशांना महापालिकेनं तयार केलेल्या खोल्यांमध्ये किंवा घरीच क्वारंटाइनमध्ये राहण्याची सूचना देण्यात आली होती. दरम्यान होम क्वारंटाइनमध्ये राहण्यास सांगण्यात आलेल्या प्रवाशांपैकी १२०० प्रवासी सध्या कुठे आहेत, याचा पत्ताच महापालिकेला नाही. त्यांचा शोध घेण्याचं काम सध्या सुरू आहे. यामुळे मुंबई महापालिकेसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. -सविस्तर वृत्त वाचण्यासाठी क्लिक करा

07:59 (IST)30 Mar 2020
महाराष्ट्रात रविवारी दोघांचा मृत्यू

दिल्लीत रविवारी २३ जणांना करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. तर महाराष्ट्रात दोघांचा मृत्यू झाला. देशातील करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या १ हजार २४ झाली असून, आतापर्यंत २७ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ९६ जणांची प्रकृती बरी झाल्यानं घरी सोडण्यात आल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.

07:56 (IST)30 Mar 2020
संचारबंदीची शिस्त; पोलिसांचा रात्रदिन पहारा

संपूर्ण देशात लॉकडाउन आहे. महाराष्ट्रात सर्वात आधी लॉकडाउन लागू करण्यात आला. मुंबई, पुण्यात करोना बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर राज्य सरकारनं तातडीनं हा निर्णय घेतला. यामुळे सध्या मुंबईतील रस्ते २४ तास निपचित पडलेले असतात. फक्त अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांनाच बाहेर पडत येत असून त्यांचीही चौकशी पोलिसांकडून केली जात आहे. रात्रदिवस हे काम सुरू आहे.