देशातील करोना संकट अजूनही नियंत्रणात आल्याची परिस्थिती नाही. देशातील रुग्णसंख्या ६४ लाखांच्या घरात पोहोचली आहे. तर मृतांचा आकडाही एक लाखांच्या जवळ पोहोचला आहे. करोनामुळे मरण पावणाऱ्या मृतांचा जगभरातील आकडेवारीवर नजर टाकल्यास करोनामुळे मृत्यू होणारा प्रत्येक दहावा रुग्ण भारतातील आहे.

करोनानं शिरकाव केल्यानंतर देशात सुरूवातील करोना रुग्ण वाढीचा वेग मर्यादीत स्वरूपात होता. मात्र, लॉकडाउन शिथिल करण्यास सुरूवात केल्यानंतर रुग्णवाढीचा स्फोट झाल्याचंच आकडेवारीतून दिसून येत आहे. विशेष म्हणजे देशातील मृतांचा आकडाही वेगानं वाढत आहे. देशात काही दिवसांपासून दररोज एक हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू होत असल्याची नोंद होत आहे. देशात आतापर्यंत ९९ हजार ७७३ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. ही संख्या जगाच्या एकूण संख्येपैकी दहा टक्के आहे. म्हणजे मरण पावणाऱ्या प्रत्येक दहावा व्यक्ती हा भारतातील आहे.

दिवसाचा विचार केल्यास जगात दररोज पावणाऱ्या एकूण रुग्णांपैकी भारतातील संख्या १५ ते २५ टक्के इतकी आहे. जगात दररोज ४ हजार ते ६ हजारांच्या दरम्यान करोना रुग्णांचा मृत्यू होत आहे. त्यात गेल्या महिनाभरापासून भारतात १ हजारांपेक्षा जास्त रुग्णांच्या मृत्यूची नोंद होत आहे. महत्त्वाचं म्हणजे भारतापेक्षा अधिक मृत्यू नोंदवल्या जाणाऱ्या राष्ट्रांमध्ये अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर भारत आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीप्रमाणे गेल्या चोवीस तासांमध्ये देशात ८१ हजार ४८४ नव्या करोना बाधितांची नोंद करण्यात झाली आहे. तर १ हजार ९५ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. नव्या रुग्णासंख्येची भर पडल्यानं देशातील करोना बाधितांची एकूण संख्या ६३ लाख ९४ हजार ४८४ वर पोहोचली आहे. यात सध्या ९ लाख ४२ हजार २१७ जणांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ५३ लाख ५२ हजार ०७८ जणांनी करोनावर मात केली आहे.