मागील काही दिवसांपासून देशातील करोना वाढीचा वेग वाढला असल्याचं दररोज समोर येणाऱ्या आकडेवारीतून दिसून येत आहे. ४० हजारांपेक्षा जास्त रुग्ण दिवसाला देशात आढळून येत असून, मागील २४ तासांतही रुग्णसंख्येची उच्चांकी नोंद झाली आहे. २४ तासात ५२ हजार करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील एकूण रुग्णसंख्या १५ लाख ८३ हजार ७९२ इतकी झाली आहे. तर याच कालावधीत देशभरात ७७५ जणांचा करोना संसर्गानं मृत्यू झाला आहे.

करोनामुळे देशात अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक राज्यांमध्ये रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होत असून, लॉकडाउन शिथिल करण्यासंदर्भातील उपाययोजना खिळ बसलेली दिसत आहे. दुसरीकडे देशातील एकूण रुग्णसंख्या वाढीचा वेगही वाढला असून, २४ तासात आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे.

देशात पहिल्यांदाच २४ तासांमध्ये ५० हजारांपेक्षा जास्त करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. चिंताजनक बाब म्हणजे २४ तासात आतापर्यंतचे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. २४ तासांमध्ये ५२ हजार १२३ नवीन करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील एकूण रुग्णसंख्येचा आकडा आता १६ लाखांच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचला आहे. देशातील एकूण रुग्णसंख्या १५ लाख ८३ हजार ७९२ इतकी झाली आहे. तर ७७५ रुग्णांचा २४ तासांत मृत्यू झाला आहे.

या चिंताजनक आकडेवारीत दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत देशात १० लाख २० हजार ५८२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर देशात आतापर्यंत ३४ हजार ९६८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही आकडेवारी जाहीर केली आहे.