दिवसागणिक देशातील करोनाग्रस्तांची संख्या वाढतच आहे. शुक्रवारी एकूण करोनाबाधितांच्या संख्येत भारताने चीनला मागे टाकले होते. शनिवारी, देशातील करोनाग्रस्तांची संख्या ९० हजारांच्या पुढे गेली आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, देशातील करोनाग्रस्तांची संख्या ९० हजार ६४८ झाली आहे. गेल्या आठ दिवसातील करोनाग्रस्त विदेशातून आलेले किंवा मुंबईसारख्या मोठ्या शहरातून गाव-खेड्यात पोहलले रूग्ण आहेत. स्थलांतरामुळे शहरातील करोना गाव खेड्यात पोहचल्याचे चित्र आहे.

देशातील मोठ्या शहराची परिस्थिती चिंताजनक असून एकूण करोनाग्रस्तांच्या संख्येपैकी ५० टक्केंपेक्षा जास्त रूग्ण मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, चेन्नई आणि पुणे या पाच शहरातील आहेत. या पाच शहरातील करोनाग्रस्तांची संख्या जवळपास ४६ हजार आहे. करोनामुळे मृत्यू झालेल्या रूग्णांची संख्या दोन हजार ८७१ इतकी असून, ३४ हजार २२४ रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत.

तिसऱ्या लॉकडाउनचा अखेरचा दिवस
रविवार रात्री लॉकडाउन 3.0 संपणार असून सोमवारपासून चौथ्या टप्याला सुरूवात होणार आहे. चौथ्या टप्यात आर्थिक व्यवहाराला सुट मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वाढती करोनाग्रस्तांची संख्या पाहता लॉकडाउन संपण्याची शक्यता कमीच आहे. मात्र, आर्थिक व्यवहार तेसच दैनदिन जनजीवन शिथिल होऊ शकते.

करोना रुग्णांमध्ये भारत ११ व्या स्थानी –
जगात करोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढतच असून आतापर्यंत ४५ लाखांपेक्षा जास्त जणांना संसर्ग झाला आहे. करोनाग्रस्तांच्या संख्येत भारताचा जगात ११ वा क्रमांक लागतो यामध्ये अमेरिका, रशिया, ब्राजील, फ्रान्स, इटली, स्पेन आणि पेरु या देशानंतर भारतामध्ये करोनाबाधितांची संख्या आधिक आहे.

महाराष्ट्रातील स्थिती..
राज्यात एका दिवसात १६०६ नव्या रुग्णांची भर पडली. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३० हजार ७०६ झाली आहे. चोवीस तासांत ६७ करोनाबाधितांचा मृत्यू झाला असून यात मुंबईतील ४१ जणांचा समावेश आहे.

पोलीस दल हादरले..
मुंबई पोलीस दलातील दोन अधिकाऱ्यांचा करोनामुळे मृत्यू झाला. शाहूनगर पोलीस ठाण्यातील ३२ वर्षीय साहाय्यक पोलीस निरीक्षक आणि मोटार परिवहन विभागातील साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हे दोन अधिकारी शनिवारी करोनाचे बळी ठरले. पोलीस दलातील बळींचा आकडा वाढत असतानाच आता एका तरुण अधिकाऱ्याच्या मृत्यूने पोलीस दल हादरले आहे. मुंबई पोलीस दलात आत्तापर्यंत करोनामुळे आठ मृत्यू झाले आहेत.