सलग दुसऱ्या दिवशी पाच हजारांहून अधिक बाधितांची नोंद

नवी दिल्ली : जगभर थमान घालणाऱ्या करोनाचा भारतातील फैलावही वाढला आहे. गेल्या दोन दिवसांपासून देशात रोज पाच हजारांहून अधिक रुग्णांची भर पडत असून, २४ तासांत ५,६०९ नवे रुग्ण आढळले.

देशातील एकूण रुग्णसंख्या १,१२,३५९ वर पोहोचल्याचे आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सकाळी स्पष्ट केले. तसेच उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या ६३,६२४ असून, ४५ हजार रुग्ण बरे झाले आहेत, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले होते. मात्र, विविध राज्यांनी दिवसभरातील आकडेवारी जाहीर केल्यानंतर देशातील रुग्णांचा आकडा गुरुवारी संध्याकाळी १,१३,१३६ वर पोहोचल्याचे स्पष्ट झाले. देशात महाराष्ट्राबरोबरच दिल्ली, गुजरात, आंध्रप्रदेशमध्ये रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. देशात करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ३४०० हून अधिक आहे. मृत्युदर ३.०६ टक्के इतका आहे. जगभरातील किमान १५ देशांतील मृतांची संख्या भारतापेक्षा अधिक आहे.

देशात पहिला रुग्ण ३० जानेवारी रोजी आढळला होता. त्यानंतर ४५ दिवसांनी म्हणजे १५ मार्च रोजी भारतातील करोनाबाधितांची संख्या १०० वर पोहोचली. तर भारताने एक हजाराचा टप्पा अधिक वेगाने म्हणजे २९ मार्च रोजी गाठला तर १३ एप्रिलपर्यंत बाधितांची संख्या १० हजारांवर गेली. ६ मे रोजी बाधितांची संख्या ५० हजारांवर पोहोचली तर बाधितांची संख्या एक लाखावर पोहोचण्यासाठी दोन आठवडय़ांहून कमी कालावधी लागला. जागतिक पातळीवर बाधितांची संख्या ५० लाखांवर पोहोचली आहे तर तर ३.३ लाख जणांचा मृत्यू झाला आहे आणि १९ लाखांहून अधिक जण बरे झाले आहेत.

जगात रुग्णसंख्येत भारत अकराव्या स्थानी

करोनाबाधितांच्या संख्येत जगात भारत अकराव्या स्थानावर आहे. मात्र, जगातील सुमारे १५ देशांतील मृतांचा आकडा भारतापेक्षा अधिक आहे. भारतात सध्या ६४ हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असलेल्या रुग्णसंख्येबाबत अमेरिका, रशिया, ब्राझील आणि फ्रान्सनंतर भारत पाचव्या स्थानावर आहे.

राज्यात २,३४५ नवे रुग्ण

’देशात सर्वाधिक रुग्णसंख्या महाराष्ट्रात आहे. राज्यात सलग पाचव्या दिवशी करोनाचे दोन हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत.

’राज्यात गुरुवारी करोनाचे २,३४५ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णसंख्या ४१,६४२ वर पोहोचली.

’दिवसभरात राज्यात ६४ करोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील मृतांचा आकडा १४५४ झाला आहे.