नवी दिल्ली :देशात कोविड १९ रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या आता २ लाख ८१ हजार ६६७ आहे, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

रोजच्या नवीन रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. देशातील एकूण रुग्णांत उपचार घेत असलेल्या रुग्णांचे प्रमाण २.७७ टक्के आहे. भारतात एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ९७ लाख ४० हजार १०८ आहे. कोविड १९ रुग्ण बरे होण्याचे प्रमाण भारतात सर्वाधिक आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्के असून गेल्या २९ दिवसांत बरे होणाऱ्या  रुग्णांचे दैनंदिन प्रमाण वाढले आहे. तर दैनंदिन रुग्णांची संख्या मात्र कमी झाली आहे. काल २२ हजार २७४ रुग्ण ब रे होऊन घरी गेले आहेत.

दहा राज्ये व केंद्रशासित प्रदेशांत बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण ७३.५६ टक्के असून  केरळात एका दिवसातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक म्हणजे ४५०६ आहे. पश्चिम बंगालमध्ये ती १९५४, महाराष्ट्रात १४२७ आहे.

केरळात नवीन रुग्णांची संख्या  ५३९७ असून महाराष्ट्रात ३४३१ तर पश्चिम बंगालमध्ये १५४१ आहे.  काल एकूण २५१ रुग्ण मरण पावले आहेत. दहा राज्ये व केंद्रशासित प्रदेशात नवीन मृत्यूंचे प्रमाण ८५.२६ टक्के आहे. यात महाराष्ट्रात सर्वाधिक ७१, पश्चिम बंगाल ३१ तर दिल्ली ३० याप्रमाणे बळींची संख्या आहे.

 गुजरातमध्ये ऑनलाइन नोंदणी

गुजरातमध्ये अहमदाबाद महापालिकेने कोविड १९ प्रतिबंधक लस घेऊ इच्छिणाऱ्यांची ऑनलाइन नोंदणी सुरू झाली आहे पण त्यात तूर्त जोखमीच्या गटातील लोकांचाच समावेश करण्यात आला आहे, असे अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले.

अहमदाबाद महापालिकेने म्हटले आहे की, शहरातील जोखमीच्या गटामधील व्यक्तींनी लशीसाठी ऑनलाइन नोंदणी करणे गरजेचे आहे. ज्यांनी अजून नोंदणी केली नसेल त्यांनी ती घरोघरी पाहणी करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने करून घ्यावी.

ब्रिटनमधून कर्नाटकात आलेल्या १४ जणांची तपासणी

बेंगळुरू : ब्रिटनमध्ये नवा कोविड १९ विषाणू आल्यानंतर तेथून कर्नाटकात परतलेल्या १४  जणांच्या चाचण्या होकारात्मक आल्या आहेत पण त्यांच्यात हा नवीन विषाणू आहे की नाही याचा शोध घेण्यासाठी हे नमुने जनुकीय क्रमवारीसाठी पाठवण्यात आले आहेत. एकूण २५०० लोक ब्रिटनमधून आले आहेत त्यांच्यापैकी १६३८ जणांची चाचणी करण्यात आली त्यातून जी माहिती हाती आली आहे त्यानुसार चौदा जणांच्या चाचण्या होकारात्मक आल्या आहेत. हे चौदाही नमुने एनआयएमएचएएनएस (निमहंस) या संस्थेत जनुकीय क्रमवारी उलगडण्यासाठी पाठवण्यात आले आहेत.