देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार केला. दरम्यान, गेल्या काहीदिवसांपासून देशात करोनाच्या आकडेवारीत चढ-उतार दिसत आहे. मात्र, आज मोठा दिलासा मिळाला आहे. देशात चार महिन्यांनंतर करोना रुग्णसंख्या ३० हजारांहून कमी नोंदवण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या २४ तासांत २९ हजार ६८९ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर ४१५ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच ४२ हजार ३६३ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत.

यापूर्वी देशात सोमवारी ३९ हजार ३६१ आणि रविवारी ३९ हजार ७४२ नवीन करोना रुग्ण आढळले होते. त्यामुळे आजची आकडेवारी दिलासादायक आहे. तसेच देशात सक्रिय रुग्णसंख्येतही घट झाली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने करोनाची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार देशात २९ हजार ६८९ करोना रुग्ण आढळले. तर ४१५ रुग्णांचा करोनामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या देशात ३ लाख ९८ हजार १०० सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत देशात ३ कोटी ०६ लाख २१ हजार ४६९ जणांनी करोनावर मात केली आहे.

राज्यालाही दिलासा

राज्यात दुपटीहून अधिक रूग्ण करोनातून बरे झाल्याचे दिलासादायक चित्र समोर आले आहे. राज्यात करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असल्याचे दिसत आहे. मात्र तरी देखील दररोज नवीन करोनाबाधित आढळून येत असून, करोनाबाधितांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे. दररोज आढळणारी करोनाबाधितांची संख्या करोनामुक्त झालेल्यांच्या तुलनेत कधी जास्त तरी कधी कमी आढळून येत आहे.  राज्यात आढळलेल्या करोनाबाधितांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या ही दुपटीहून अधिक आढळल्याचे दिसून आले आहे. राज्यात ११ हजार ७७ रूग्ण करोनातून बरे झाले असून, ४ हजार ८७७ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. याशिवाय राज्यात आज ५३ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ६०,४६,१०६ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९६.४३ टक्के एवढे झाले आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर २.०९ टक्के एवढा आहे.