News Flash

पंतप्रधानांनी बोलावली तातडीची उच्चस्तरीय बैठक; महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता

केंद्रीय अधिकाऱ्यांची बैठकीला राहणार उपस्थिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी. (संग्रहित छायाचित्र)

महाराष्ट्रासह देशातील ८ राज्यांमध्ये करोनाने थैमान घातलं असून, विषाणू संक्रमण प्रचंड वेगानं वाढलं आहे. मागील तीन दिवसांपासून देशात ८० ते ९० हजारांच्या सरासरीनं रुग्ण आढळून आल्यानं चिंतेत भर पडली आहे. अचानक रुग्णसंख्येचा विस्फोट झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय अधिकाऱ्यांची तातडीने उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत लसीकरणाच्या मुद्द्यासह करोना संक्रमण रोखण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रासह देशातील आठ राज्यांमध्ये करोना झपाट्याने वाढू लागला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीप्रमाणे महाराष्ट्र, कर्नाटक, छत्तीसगढ, दिल्ली, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, पंजाब आणि मध्य प्रदेशात करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. देशात आढळून आलेल्या एकूण रुग्णसंख्येपैकी या आठ राज्यातील रुग्णांची संख्या ८१.४२ टक्के इतकी आहे. तर सर्वाधिक रुग्णासंख्या असलेल्या देशातील पहिल्या दहा जिल्ह्यांमध्ये पुणे, मुंबई, नागपूर, ठाणे, नाशिक, बंगळुरू, औरंगाबाद, दिल्ली, अहमदनगर आणि नांदेड या जिल्ह्यांचा समावेश आहे. दहा जिल्ह्यांपैकी ९ जिल्हे हे महाराष्ट्रातील असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.

करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीला केंद्रीय सचिव, पंतप्रधानांचे प्रधान सचिव, केंद्रीय आरोग्य सचिव यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित असणार आहे. डॉ. विनोद पॉल हे सुद्धा या बैठकीत सहभागी होणार आहेत, असं वृत्त एएनआय वृत्तसंस्थेनं सूत्रांच्या हवाल्याने दिलं आहे. या बैठकीत करोना लसीकरणाबरोबरच करोना परिस्थितीबाबत चर्चा केली जाणार आहे.

महाराष्ट्रात विक्रमी वाढ…

देशामध्ये इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली आहे. राज्यात शनिवारी ४९ हजार ४४७ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर २७७ जणांचा मृत्यू झाला. उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्याही चार लाखांवर गेली आहे. मृतांमध्ये सर्वाधिक पुणे शहर ३७, नाशिक शहर १५, औरंगाबाद शहर ३१, नांदेड शहर १३, नागपूर शहर २१, उर्वरित नागपूर जिल्हा १४ जणांचा समावेश आहे. तर उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ७३,५९९ रुग्ण आहेत. मुंबई ६०,८४६, नाशिक ३१,५१२, औरंगाबाद १४,३०२, नागपूर जिल्हा ५२,४०८ रुग्ण उपचाराधीन आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2021 12:04 pm

Web Title: coronavirus india updates pm modi chairs high level meeting to review covid situation bmh 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 चिंता वाढली! २४ तासांत ९३ हजार नवीन रुग्ण; ५१३ जणांचा मृत्यू
2 केंद्राचा मोठा निर्णय! आरोग्य कर्मचारी आणि कोविड योद्ध्यांची लसीकरण नोंदणी थांबवली
3 छत्तीसगडमध्ये चकमकीत  ५ जवान शहीद
Just Now!
X