भारतावर सध्या करोनाचं संकट असताना याच मुद्द्यावरुन भारताची महिला कुस्तीपटू बबिता फोगट सध्या सोशल मीडियावर ट्रोल होत असून नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहे. बबिता फोगटचं ट्विट यासाठी कारणीभूत ठरलं आहे. या ट्विटच्या माध्यमातून बबिता फोगटने तबलिगी जमातवर निशाणा साधला होता. यानंतर अनेकजण बबिता फोगटचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्याची मागणी करत आहेत. इतकंच नाही तर तिला फोन, मेसेज करुन धमकावलंही जात आहे. बबिता फोगटने धमकावणाऱ्यांना सणसणीत उत्तर दिलं असून आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं म्हटलं आहे. बबिता फोगटने ट्विटरला व्हिडीओ अपलोड करत आपली बाजू मांडली असून धमकावणाऱ्यांना तुमच्या धमक्यांना घाबरुन घरी बसायला मी झायरा वसीम नाही अशा शब्दांत सुनावलं आहे.

धमकावणाऱ्यांना बबिता फोगटचं उत्तर –
“काही दिवसांपूर्वी मी ट्विट केले होते. त्यानंतर अनेक लोक मला फेसबुक, ट्विटरला मेसेज पाठवून शिव्या देत आहेत, धमकावत आहेत. काही लोक फोन करुनही धमक्या देत आहे. त्या सगळ्यांना मला सांगायचं आहे की, कान उघडून ऐका आणि एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या धमक्यांना घाबरुन घरी बसायला मी झायरा वसीम नाही. मी तुमच्या पोकळ धमक्यांना घाबरणारी नाही. मी बबिता फोगट आहे. नेहमी आपल्या देशासाठी लढली आहे आणि असंच लढत राहणार, बोलत राहणार. मी माझ्या ट्विटमध्ये काहीही चुकीचं लिहिलेलं नाही. मी आपल्या ट्विटवर कायम आहे आणि यापुढेही राहीन. मी फक्त त्या लोकांबद्दल लिहिलं आह ज्यांनी करोना विषाणूचा फैलाव केला आहे. तबलिगी जमात अजूनही एक नंबरवर नाही आहे का ? असं मला तुम्हाला विचारायचं आहे. तबलिगी जमातने करोनाचा फैलाव केला नसता तर आतापर्यंत लॉकडाउन संपला असता आणि भारताने करोनाला हरवलं असतं. ज्यांना सत्य ऐकण्यात समस्या आहे त्यांना सांगायचं आहे की मी सत्य बोलत राहणार, लिहित राहणार. तुम्हाल सत्य ऐकायला आवडत नसेल तर आपली सवय बदला किंवा सवय लावून घ्या,” असं उत्तर बबिता फोगटने दिलं आहे.

कोणत्या ट्विटवरुन वाद सुरु आहे –
काही दिवसांपूर्वी बबिता फोगटने एक ट्विट करत तबलिगी जमातवर निशाणा साधला होता. यात तिने म्हटलं होतं की, करोना व्हायरस भारतातील दुसऱ्या क्रमांकाची समस्या आहे. तिच्या या ट्विटवर मोठा वाद झाला आहे. कारण तिने पहिल्या क्रमांकावर तबलिगी जमात असल्याचा उल्लेख ट्विटमध्ये केला आहे. यानंतर तिला ट्रोल केलं जात असून ट्विटरला #SuspendBabitaPhogat हॅशटॅग ट्रेंड होत आहे.

दरम्यान ट्विटरला एकीकडे बबिता फोगटला विरोध होत असून ट्रोलं केलं जात असताना तिला समर्थनही मिळत आहे. बबिता फोगटला समर्थन करणाऱ्यांनी #ISupportBabitaPhogat हा हॅशटॅगही ट्रेंड केला आहे.

आणखी वाचा- तबलिगी जमातने करोनाचा फैलाव केला नसता तर आतापर्यंत लॉकडाउन संपला असता – बबिता फोगट

झायरा वसीम कोण आहे ?
फोगट बहिणींच्या आयुष्यावर आधारित ‘दंगल’ चित्रपटातून प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री झायरा वसीमने चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला आहे. आपल्या धर्मातील काही लोकांना हे क्षेत्र आपल्यासाठी योग्य नाही आणि बॉलिवूडमुळे आपण धर्मापासून लांब जात असल्याचं वाटत असल्याचं तिने सांगितलं होतं. तिला अनेकदा धमक्यादेखील मिळाल्या होत्या.