जी-७ राष्ट्रांच्या एकूण लसीकरणापेक्षाही जास्त लसीकरण भारतात फक्त ऑगस्ट महिन्यात झालं असल्याचा दावा केंद्र सरकारकडून करण्यात आला आहे. एका ट्वीटमध्ये, केंद्राचे अधिकृत हँडल MyGovIndia ने म्हटले आहे की, देशाने ऑगस्टमध्ये 180 दशलक्षांहून अधिक लस डोस दिले. ही संख्या कॅनडा, ब्रिटन, अमेरिका, इटली, जर्मनी, फ्रान्स आणि जपानचा समावेश असलेल्या 7 राष्ट्रांच्या सर्व गटांपेक्षा अधिक आहे.

MyGovIndia ने ट्विट केलेल्या आकडेवारीनुसार, कॅनडाने जी-७ राष्ट्रांमध्ये अनुक्रमे, सर्वात कमी आणि सर्वोच्च श्रेणीमध्ये तीन दशलक्ष डोस आणि जपानने ४० दशलक्ष डोस दिले. “अजून एक कामगिरी! ऑगस्ट महिन्यात 180 दशलक्षांहून अधिक लसीचे डोस दिल्याने, भारत आपल्या लोकसंख्येला प्राधान्याने लसी देण्यात जागतिक पातळीवर सर्वात पुढे”, अशा आशयाचं ट्विट करण्यात आलं आहे.


देशात आतापर्यंत एकूण कोविड -१९ लसीचे डोस ६८ कोटींहून अधिक डोस देण्यात आले. देशात आज कोविड -१९ चे ४२,७६६ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर महाराष्ट्रानेही लसीकरणाचा विक्रम नोंदवला आहे. करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत शनिवारी सायंकाळी आठ वाजेपर्यंत १२ लाख सहा हजार ३२७ नागरिकांना लस देण्यात आली असून राज्याने नवीन विक्रम नोंदविला आहे. आता ह्या आकड्यात आणखी वाढ झाली असेल.

हेही वाचा – राज्यासह मुंबईत लस विक्रम

राज्यात आतापर्यंत दिलेल्या एकूण मात्रांची संख्या सहा कोटी २७ लाखांवर गेली आहे. देशभरात उत्तरप्रदेश पाठोपाठ महाराष्ट्राने ही विक्रमी कामगिरी केली आहे. राज्यात २१ ऑगस्ट रोजी एकाच दिवशी ११ लाख ४ हजार ४६४ नागरिकांना लस देऊन महाराष्ट्राने आतापर्यंतची सर्वाधिक संख्या नोंदविली होती. शनिवारी रात्री आठपर्यंत बारा लाख सहा हजाराचा टप्पा गाठून नवीन विक्रम नोंदविला आहे. आरोग्य यंत्रणेतील सर्व घटकांच्या परिश्रमाचे हे फलित आहे, असे सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले. दुसऱ्या लसीची मात्रा देण्यात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. राज्यात एक कोटी ७१ लाख जणांना लसीच्या दोन्ही मात्रा देण्यात आल्या आहेत.