जनुकीय क्रमवारी प्रयोगशाळा, बालरोगतज्ज्ञ कृती दल स्थापणार

देशात करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असून त्यामध्ये दररोज ३७ हजार जण बाधित होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने अशा स्थितीचा मुकाबला करण्यासाठी दिल्ली सरकारने तयारी केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून बालरोगतज्ज्ञांचे एक कृती दल आणि जनुकीय क्रमवारी करणाऱ्या दोन प्रयोगशाळा स्थापन करण्यात येणार असून प्राणवायू क्षमतेमध्ये वाढ करणार असल्याची घोषणा शनिवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली.

लोकनायक जयप्रकाश रुग्णालय आणि यकृत व पित्त विज्ञान संस्था येथे दोन जनुकीय प्रयोगशाळा स्थापन करण्याबरोबरच महत्त्वाच्या औषधांचाही पुरेसा साठा करून ठेवण्यात येणार आहे, तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आपण शुक्रवारी अधिकारी आणि तज्ज्ञांची सहा तास बैठक घेतली आणि व्यापक योजना आखली आहे, असे केजरीवाल म्हणाले.

करोनाच्या दुसऱ्या लाटेत एका दिवशी २८ हजार बाधित आढळले, त्यामुळे तिसऱ्या लाटेत ही संख्या ३७ हजारांपर्यंत जाऊ शकते, असे गृहीत धरून आम्ही खाटांची संख्या, प्राणवायू क्षमता आणि औषधे उपलब्ध करण्यात येणार आहेत, सरकार प्राणवायूचे २५ टँकर खरेदी करणार असून येत्या काही आठवड्यांत ६४ प्राणवायू प्रकल्प उभारणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.