दुबईहून कर्नाटकातील मंगळूरू विमानतळावर दाखल झालेल्या एका व्यक्तीमध्ये करोना विषाणूची लक्षणं दिसून आल्याने त्याला रुग्णालयात आयसोलेशन वॉर्डमध्ये वैद्यकीय निरिक्षणाखाली ठेवण्यात आलं होतं. मात्र, तो इथून बेपत्ता झाला आहे. या प्रकारामुळे कर्नाटकात एकच खळबळ उडाली आहे.

या करोनाग्रस्त रुग्णाचे रविवारी मंगळुरू विमानतळावर आगमन झाले. विमातळावर प्राथमिक तपासणी झाल्यानंतर त्याच्यामध्ये तीव्र ताप आणि करोना आजाराची लक्षणं आढळून आली. त्यामुळे त्याला जिल्ह्याच्या वेनलॉक रुग्णालयात आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले. दरम्यान, मध्यरात्री त्याचा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसोबत वाद झाला. यावेळी आपल्याला या विषाणूचा संसर्ग झाला नसून इथून निघून जाऊन खासगी रुग्णालयात आपण उपचार घेणार असल्याचं त्यानं म्हटलं होतं. आपलं हे म्हणणं खरं करुन दाखवत त्यानं गुपचूप कोणालाही न सांगता रुग्णालयातून पलायन केलं. इंडिया टुडेनं याबाबत वृत्त दिलं आहे.

ही बाब उघड झाल्यानंतर रुग्णालय प्रशासनामध्ये एकच खळबळ माजली. रुग्णालयाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी पोलिसांना फोन केला आणि घटनेची माहिती दिली. त्यानंतर या रुग्णाला शोधण्यासाठी जिल्ह्यात हायअॅलर्ट जारी करण्यात आला. यावर दक्षिण कन्नडा जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी सिकंदर पाशा यांनी सांगितले की, “रुग्णाला २४ तासांसाठी निरिक्षणाखाली ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर काही नेहमीच्या चाचण्या करुन त्याला सोडण्यात येणार होतं. मात्र, तत्पूर्वीच तो रुग्णालयातून पळून गेला.”

याप्रकरणी जिल्हा आरोग्य विभागाने सोमवारी रितसर पोलिसांत या बेजबाबदार रुग्णाविरोधात तक्रार दाखल केली. यानंतर पोलीसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.