नवी दिल्ली : कोविड-१९ लसीकरण केंद्रात येणाऱ्या प्रत्येकाला लस मिळाली पाहिजे, अशी मागणी गुरुवारी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली. त्याचप्रमाणे ज्यांच्याकडे इंटरनेट नाही त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे, असेही ते म्हणाले.

गरिबांना विशेषत: जे दुर्गम आणि ग्रामीण भागात राहतात त्यांना आणि ज्यांच्याकडे डिजिटल अथवा स्मार्ट भ्रमणध्वनी नाहीत त्यांना लस मिळण्याबाबत काँग्रेस आग्रही आहे. लस मिळण्यासाठी ‘कोविन’वर नोंदणी करणे बंधनकारक नसावे, अशी मागणीही काँग्रेसने केली आहे.

लशीसाठी ऑनलाइन नोंदणी केवळ पुरेशी नाही, लसीकरण केंद्रात येणाऱ्या प्रत्येकाला लस मिळाली पाहिजे, ज्यांच्याकडे इंटरनेट नाही त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे, असे राहुल गांधी यांनी ट्वीट केले आहे.