बीजिंग : करोनाग्रस्त चीनमध्ये लागोपाठ पंधराव्या दिवशी बरे झालेले रुग्ण व घरी सोडण्यात आलेले रुग्ण यांची संख्या ही नवीन निश्चित रुग्णांपेक्षा अधिक झाली आहे. १९ फेब्रुवारीनंतर हा बदल दिसून आल्याचे हुबेई प्रांतातील रोगनियंत्रण व प्रतिबंध केंद्राचे प्रमुख ली यांग यांनी सांगितले.

हुबेई प्रांताची लोकसंख्या ५ कोटी असून हा सगळा भाग चीन सरकारने २३ जानेवारीपासून बंद ठेवला होता. आता मंगळवारपासून हुबेईतील २२ शहरे कमी जोखमीची, १७ मध्यम जोखमीची तर ३७ उच्च जोखमीची आहेत असे सांगण्यात आले.

चीनमध्ये करोना विषाणूने घेतलेल्या बळींची संख्या आता ३०४२ झाली आहे. गुरुवारी तीस जण मरण पावले असून निश्चित रुग्णांची संख्या ही ८०५५२ झाली आहे. करोना विषाणूच्या बळींची संख्या कमी होत असून रुग्णांचा आकडाही दैनंदिन पातळीवर कमी होत चालला आहे.

चीनी राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या अहवालानुसार, गुरुवारी नवीन १४३ रुग्ण सापडले असून, तीस जणांचा मृत्यू झाला. हुबेई प्रांतात त्यातील २९ जण मरण पावले असून एकाचा हैनान प्रांतात मृत्यू झाला. दरम्यान नवीन संशयितांची संख्या १०२ असून ती एकूण ४८२ झाली. एकूण निश्चित रुग्णांची संख्या ही ८०५५२ आहे. एकूण मृतांची संख्या ३०४२ झाली असून २३७८४ लोकांवर अजून उपचार सुरू आहेत. ५३७२६ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले.

नवीन पाच देशांत शिरकाव

बोस्निया, हझेगोव्हिना, जिब्राल्टर, हंगेरी, स्लोव्हेनिया, व्याप्त पॅलेस्टाइन प्रदेश या पाच नवीन देशांत करोनाचा शिरकाव झाला आहे. दक्षिण कोरियात ५१८ नवीन रुग्ण सापडले असून एकूण रुग्ण ६२८४ झाले आहेत.

इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या सल्लागाराचा करोनाने मृत्यू

तेहरान : इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांचे सल्लागार होसेन शेखहोलेस्लाम यांचा करोनाच्या संसर्गाने मृत्यू झाला आहे.  इराणमध्ये करोनाचा प्रसार वेगाने होत असून आतापर्यंत ३५१३ रुग्ण व १०७ बळी अशी स्थिती आहे.

शेखहोलेस्लाम हे परराष्ट्र मंत्री महंमद जवाद शरीफ यांचे सल्लागार होते. सीरियाचे माजी राजदूत म्हणून त्यांनी काम केले होते. १९८१ ते १९९७ या काळात ते उप परराष्ट्रमंत्री होते. करोना विषाणूने इराणमधील परिस्थिती भीषण असून आतापर्यंत सर्वोच्च नेते अयोतोल्ला अली खामेनी यांचे सल्लागार महंमद मीर महंमदी, गिलानचे खासदार महंमद अली रामेझनी यांचा करोना संसर्गाने मृत्यू झाला. तेहरानचे खासदार फातेमेह राहबर हे कोमात गेले असून त्यांनाही संसर्ग झाला आहे. इराणमध्ये शाळा, विद्यापीठे बंद करण्यात आली असून सांस्कृतिक व क्रीडा कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. देशात कामाचे तासही कमी करण्यात आले आहेत. तेथील ३१ प्रांतात विषाणूचा प्रसार झाला आहे.

ब्रिटनमध्ये करोनाचा पहिला बळी

लंडन : ब्रिटनमध्ये करोना विषाणूचा पहिला बळी गेला असल्याची माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी ख्रिस व्हिटी यांनी दिली. आता तेथे निश्चित रुग्णांची संख्या ११५ झाली आहे.

सदर रुग्ण हा वयस्कर होता. त्याला अन्य काही रोगांची बाधा होती. त्यातच करोना विषाणूची लागण झाल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याच्यावर पश्चिम लंडनमध्ये रॉयल बर्कशायर रुग्णालयात उपचार सुरू होते. ब्रिटनमध्येच त्याला विषाणूचा संसर्ग झाला होता. आता ब्रिटनमधील निश्चित रुग्णांच्या संख्येत २५ ची भर  पडली असून ही संख्या ११५ झाली आहे. त्यातील  सतराजण हे करोनाग्रस्त देशात जाऊन आलेले आहेत.

आपत्कालीन बैठकीनंतर ब्रिटनचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार पॅट्रिक व्हॅलन्स यांनी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना माहिती दिली. या आठवडय़ात काही उपाययोजना जाहीर केल्या जातील, असे जॉन्सन यांनी त्यावर म्हटले आहे.