योकोहामा : जपानच्या क्रूझ जहाजावरील करोना विषाणूची लागण झालेल्या लोकांची संख्या आता १७४ झाली असून नव्याने ३९ रुग्ण निष्पन्न झाले आहेत. या नवीन  रुग्णांच्या चाचण्या सकारात्मक आल्या आहेत. अजूनही हजारो लोकांना जहाजावर विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. एकूण १७४ रुग्ण असल्याचे निष्पन्न झाले असून हे क्रूझ जहाज ३७०० प्रवाशांसह आले होते. ‘सीओव्हीआयडी १९’ या नव्या करोना विषाणूचे सर्वात जास्त रुग्ण या जहाजावर आहेत. चीनमध्ये या विषाणूने ११०० हून अधिक बळी घेतले आहेत. प्रवासी व कर्मचारी यांना १४ दिवस विलग ठेवण्यात आले असून त्यातील सात दिवस आता संपत आले आहेत. १९ फेब्रुवारीपर्यंत त्यांना विलग ठेवण्यात येणार आहे. या लोकांना फक्त काही काळ डेकवर जाण्याची परवानगी आहे, बाल्कनीत लोक खोकताना दिसत आहेत, असे ब्रिटिश प्रवासी सॅली अबेल यांनी सांगितले. ही आता सुटीच आहे व पूर्ण आराम चालला आहे असे त्यांनी म्हटले आहे. यार्डले वोंग यांनी म्हटले आहे की, विलगीकरणात ठेवल्याने व नवीन रुग्ण सापडल्याच्या बातम्या येत असल्याने नैराश्य येत आहे. परिस्थिती सतत बदलत असून आम्ही या जहाजावर अतिशय आदर्श पद्धतीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले आहे. काही वेळा इंटरनेट सेवेत मात्र अडथळे येत असल्याबाबत आपण दिलगीर आहोत असे जहाजाच्या कप्तानाने म्हटले आहे. डायमंड प्रिन्सेस जहाजासाठी असलेल्या सेवेची इंटरनेट तरंगलांबी अधिक असून जास्तीत जास्त मोबाइल व लॅपटॉप त्याला जोडलेले आहेत. प्रवासी विलगीकरणाच्या रिकामपणात कंटाळा घालवण्यासाठी इंटरनेटचा वापर करीत आहेत. त्यात चित्रपट पाहतानाच काही वेळा, प्रश्नमंजूषा, गेम्स व सुडोकू ही साधने वापरत आहेत. विलगीकरण अधिकाऱ्याने जहाजावरील रुग्णांच्या चाचण्या केल्या त्यालाच विषाणूची लागण झाली आहे, असे ‘योमिउरी शिंबुन’ या वृत्तपत्राने म्हटले आहे. जपानचे आरोग्यमंत्री काटसुनोबू काटो यांनी दिलेल्या माहितीनुसार रुग्णालयात चार जण गंभीर अवस्थेत असून त्यांना अतिदक्षता विभागात कृत्रिम श्वास यंत्रणेवर ठेवले आहे.