करोना व्हायरस हा नैसर्गिक नसून प्रयोगशाळेत तयार करण्यात आला आहे असा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. “आपल्याला करोनासोबत राहण्याची सवय करुन घेण्याची गरज आहे. करोनासोबत जगण्याची कला समजून घेतली पाहजे. हा नैसर्गिक व्हायरस नसल्याने जगण्याची कला आत्मसात करणं महत्त्वाचं आहे. हा कृत्रिम व्हायरस असून जगभरातील अनेक देश त्यावर लस शोधत आहेत,” असं नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं आहे की, “व्हायरसचा शोध घेण्यासाठी चांगल्या कार्यपद्धतीची गरज आहे. जेणेकरुन आपण लगेच व्हायरसची ओळख पटवू शकतो. हे अनपेक्षित आहे कारण हा व्हायरस प्रयोगशाळेचा आहे, नैसर्गिक नाही”.

करोना व्हायरससाठी चीनला जबाबदार धरलं जात असून वुहान येथील प्रयोगशाळेतून त्याचा प्रसार झाल्याचा दावा केला जात आहे. अमेरिका तर थेट चीनवर आरोप करत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तर अनेकदा जाहीरपणे चीनमुळे करोनाचा फैलाव झाल्याचं वक्तव्य केलं आहे. त्यांनी करोनाचा उल्लेख चायनीज व्हायरस असाही केला आहे. यामुळे चीन आणि अमेरिकेत शाब्दिक युद्ध रंगलं आहे. मात्र पहिल्यांदाच नितीन गडकरींच्या निमित्ताने भारत सरकारकडून करोना व्हायरसच्या उत्पत्तीसंबंधी असं         वक्तव्य करण्यात आलं आहे.

नितीन गडकरी यांनी यावेळी भारतासहित अनेक देश करोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी तयार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. “भारतासहित जग, वैज्ञानिक करोनाशी लढण्यासाठी तयार आहे. उपाय सापडल्यानंतर आपण सकारात्मक आत्मविश्वास निर्माण करु शकतो. एकदा लस सापडली की समस्या राहणार नाही. मला वाटतं लवकरात लवकर आपल्याला या सर्व गोष्टींसाठी पर्यायी उपाय सापडेल आणि आपल्या सर्व समस्या मिटतील”.