News Flash

पोलिसांच्या सुरक्षेत भाजपा आमदाराचं जंगी बर्थडे सेलिब्रेशन, गर्दीला समजावलं सोशल डिस्टन्सिंगचं महत्त्व

वाढदिवसाला १०० हून अधिक लोक उपस्थित होते

देशभरात लॉकडाउन जाहीर केलेला असतानाही भाजपा आमदाराने नियमांचं उल्लंघन करत वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन केल्याची घटना समोर आली आहे. कर्नाटकमधील या आमदाराच्या वाढदिवसाला १०० हून अधिक लोक उपस्थित होते. तुमकुरु जिल्ह्यातील एका सरकारी शाळेत हा कार्यक्रम पार पडला. महत्त्वाची बाब म्हणजे या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी पोलिसांनीच आमदाराला सुरक्षा पुरवली होती.

भाजपा आमदार एम जयराम यांनी वाढदिवसानिमित्त मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमातील फोटो व्हायरल होत आहेत. वाढदिवसासाठी एम जयराम यांनी संपूर्ण गावाला निमंत्रित केलं होतं. त्यांच्या या पार्टीत मोठ्या प्रमाणात लोक सहभागी झाले होते. लोकांनी आजुबाजूला गर्दी केली असताना हातात ग्लोव्ह्ज घालून एम जयराम केक कापत असल्याचं फोटोत दिसत आहे. केक कापून झाल्यानंतर लोकांना जेवण्यासाठी बिर्याणी वाटण्यात आली.

कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंग अजिबात पाळलं जात नव्हतं. मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी एम जयराम यांनी भाषण करत लोकांना करोनाचा फैलाव कसा रोखला पाहिजे याबाबत समजावलं. तहसीलदार प्रदीप कुमार यांनी इंडियन एक्स्प्रेशी बोलताना सांगितलं आहे की, “आम्हाला घटनेची माहिती मिळाली असून नोटीस बजावण्यात आली आहे”.

आमदार जयराम हे व्यवसायिकदेखील आहेत. त्यांची बंगळुरुत मसाल्याची कंपनी आहे. दरम्यान कर्नाटकात करोनाचे २०७ रुग्ण असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे. ३१ जणांवर उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2020 2:39 pm

Web Title: coronavirus karnataka bjp mla birthday celebration in lockdown sgy 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 लॉकडाउन असूनही प्रियकराशी लग्न करण्यासाठी ६० किमी चालत आली प्रेयसी
2 महाराष्ट्रात Covid-19 मुळे ७.१ टक्के मृत्यूदर, तेच केरळमध्ये ०.६ टक्के, इतका फरक कसा?
3 उवा मारण्याचं औषध करोनावर ठरणार रामबाण उपाय?
Just Now!
X