केरळमधील कोल्लम जिल्ह्यामधील पुनारुल येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील पोलिसांनी लॉकडाउनचे कारण देत पोलिसांनी रिक्षा थांबवल्यामुळे एका व्यक्तीला आपल्या वयस्कर वडीलांना एक किलोमीटरचे अंतर उचलून न्यावे लागले.

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार पुनारुल येथील एका वयस्कर व्यक्तीला बुधवारी रुग्णालयामधून डिस्चार्ज देण्यात आला. कलाथूफूझा येथे राहणाऱ्या या ६५ वर्षीय व्यक्तीला पुनारुल तालुका रुग्णालयामधून डिस्चार्ज देण्यात आल्यानंतर या व्यक्तीला त्यांचा मुलगा रिक्षाने घरी घेऊन जात होता. मात्र घरापासून एक किलोमीटर अंतरावर पोलिसांनी रिक्षा अडवली. यावेळी त्यांनी रुग्णालयाशीसंदर्भातील सर्व कागदपत्र पोलिसांना दाखवली. मात्र पोलिसांनी त्यांना रिक्षा घेऊन पुढे जाऊ दिलं नाही. लॉकडाउनचे कारण देत इथून पुढे जाता येणार नाही असं पोलिसांनी सांगितलं. त्यामुळे या मुलाने एक किलोमीटरचे अंतर आपल्या वडिलांना उचलून पार केले.

या सर्व घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये मुलाने आपल्या वयस्कर वडिलांना उचलून घेतल्याचे दिसत आहे. तर या दोघांबरोबर एक वयस्कर स्त्री रुग्णालयाशी संबंधित कागदपत्र आणि इतर गोष्टी घेऊन चालताना दिसत आहे.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर केरळमधील मानवाधिकार आयोगाने स्वत: याची दखल घेत या प्रकरणाची चौकशी सुरु करण्यासंदर्भात हलचाली सुरु केल्या आहेत आहे. तर दुसरीकडे रिक्षा थांबवण्यात आली तेव्हा त्यामध्ये रुग्ण नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.