करोनामुळे अनेकांना मोठं नुकसान सहन करावं लागत आहे. हातावर पोट असणाऱ्यांच्या तर दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पण अशावेळी समाजातील काही लोक मदतीसाठी पुढे येत असून समाजाचे खरे हिरो ठरत आहे. केरळमधील चकुन्नी यांना जेव्हा करोनामुळे अनेक दुकानदारांना नुकसान सहन करावं लागत असल्याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी असं काही केलं ज्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा सुरु आहे.

चकुन्नी यांची कोझिकोडे येथे जागा असून तिथे १०० हून अधिक दुकानं आहेत. करोनामुळे यावेळी दुकानदारांना आर्थिक नुकसान झालं असून ते वेळेवर भाडं देऊ शकणार नाहीत याची चकुन्नी यांना कल्पना होती. यामुळे त्यांनी एका महिन्याचं भाडं माफ करुन टाकलं.

“आपला व्यवसाय अशा परिस्थितीतून जात असताना काय दुख: होतं हे मी समजू शकतो. काही वर्षांपूर्वी माझीही अशीच परिस्थिती होती. त्यामुळे अडचणीत असलेल्या या सर्वांना मदत करण्याची ही योग्य वेळ असल्याचं मला वाटलं,” असं चकुन्नी सांगतात.

चकुन्नी यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर १९६८ मध्ये ‘चकुन्नी अॅण्ड कंपनी’ची सुरुवात केली. “मी सेल्समन म्हणून सुरुवात केली होती. नंतर व्यवसाया सुरु केला. त्यामुळे व्यवसायाच्या या क्षेत्रात संघर्ष काय असतो हे मी पाहिलं आहे. त्यामुळेच हे दुकानदार इतक्या मोठ्या आर्थिक संकटातून जात असताना मी पाहू शकत नाही,” असं चकुन्नी यांनी सांगितलं आहे.

“काही दिवसांपूर्वी माझ्या भाडेकरुंनी मला आम्ही महिन्याऐवजी दिवसाला भाडं दिलं तर चालेल का अशी विनंती केली होती. मला त्यात काहीच समस्या नव्हती. पण काही दिवसांनी जेव्हा माझा मुलगा भाडं गोळा करण्यासाठी गेला तेव्हा त्याला काहीजणांना आपल्याकडे पैसे नसल्याचं सांगितलं. मी त्यांच्याशी बोलले तेव्हा काही व्यवसाय होत नसल्याने आर्थिक चणचण असल्याचं त्यांनी मला सांगितलं,” अशी माहिती चकुन्नी यांनी दिली आहे.

“जेव्हा मी संध्याकाळी भाडेकरुंना भेटण्यासाठी गेला तेव्हा त्यांनी दिवसभरात फक्त एकच ग्राहक असल्याचं त्यांनी सांगितलं. तोपर्यंत अनेकांना भाडं भरण्यासाठी कर्ज घेतल्याचंही मला कळालं. आपल्या कामगारांचा पगार देण्यासाठीही त्यांच्याकडे पैसे नव्हते,” असं चकुन्नी सांगतात.

चकुन्नी यांना तात्काळ आपले ऑडिटर आणि या जागांची मालकी असणाऱ्या कुटुंबातील इतर सदस्यांसी संपर्क साधला. यावेळी त्यांनी या १०० दुकानांचं १२ लाखांचं भाडं त्यांनी माफ करत असल्याचं जाहीर केलं. “मी गेल्या ५७ वर्षांपासून व्यवसायिक आहे. या कार्यकाळात मी एक गोष्ट शिकलो आहे ती म्हणजे फायदा आणि नुकसानाचा विचार न करता माणुसकीचा विचार करावा. जर एखादी गोष्ट करण्याची तुमची क्षमता आहे तर ती करण्यात काहीच हरकत नाही,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.