बीजिंग : चीनमध्ये करोना विषाणूने घेतलेल्या बळींची संख्या आता २,२३६ झाली असून आणखी ११८ मृत्यू गुरुवारी झाले आहेत. हुबेई प्रांतातच मृतांची संख्या अधिक आहे. एकूण निश्चित रुग्णांची संख्या ७५,६४५ झाली आहे. बुधवारी ११४ जणांचा मृत्यू झाला होता, त्यामुळे आता पुन्हा संख्या वाढली आहे.

नवीन रुग्ण संसर्गाची संख्या महिनाभरात प्रथमच कमी झाली आहे. गुरुवार अखेरीस २,२३६ जण मरण पावले असून देशात दिवसभरात ११८ बळी गेले, त्यात आता ८८९ नवीन निश्चित रुग्णही सापडले आहेत. एकूण १,६१४ संशयित दिवसभरात सापडले असून ५,२०६ जणांवर संसर्गाचा संशय आहे. ११८ मधील ११५ बळी हुबेईत गेले असून उर्वरित झेजियांग, चोनक्विंग व युन्नान येथे मरण पावले आहेत.

गुरुवार अखेरीस उपचारानंतर घरी पाठवण्यात आलेल्या रुग्णांची संख्या १८,२६४ झाली आहे. हुबेई प्रांत हे विषाणूचे केंद्रस्थान ठरले असून तेथे ४११ नवीन रुग्ण सापडले आहेत. तेथील एकूण रुग्णांची संख्या ६२,४२२ झाली असून वुहानमध्ये एकूण ४५,३४६ रुग्णांची निश्चिती झाली आहे. रुग्णालयात ४२,०५६ लोक दाखल असून त्यापैकी  ८९७९ जणांची प्रकृती अतिगंभीर आहे.

रुग्णालयीन कर्मचाऱ्यांना लागण

शिचेंग जिल्ह्य़ात फुसिंग रुग्णालयात आठ वैद्यकीय कर्मचारी, नऊ सफाई कर्मचारी व १९ रुग्ण यांना बाधा झाली आहे. या रुग्णालयात ३६ निश्चित रुग्ण आहेत. पेकिंग विद्यापीठाच्या रुग्णालयातही काही रुग्णांना लागण झाली. बीजिंगमध्ये ४ जण मरण पावले असून एकूण ३९५ रुग्ण निश्चित झाले आहेत.

जहाजावरून परतलेल्या दोघांना ऑस्ट्रेलियात विषाणूचा संसर्ग

सिडनी : जपानमधील डायमंड प्रिन्सेस जहाजावरून सुटका झाल्यानंतर मायदेशी परतलेल्या दोन ऑस्ट्रेलियन रुग्णांना विषाणूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. जपानमधून त्यांना विषाणूची बाधा नसल्याने जहाजावरून उतरू दिले होते, पण घरी आल्यानंतर त्यांना विषाणूचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले.