करोना विषाणूसाथीच्या जनजागृतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशवासियांना दक्षता घेण्याचे आवाहन करताना एक पोस्टर दाखवले होते. ‘कोरोना’ या नावाने असलेल्या या पोस्टरचा आधार घेवून त्यांनी संदेश दिला होता. हे पोस्टर कोल्हापुरातील एका युवकाने तयार केले आहे. विकास डिगे असे या तरुणाचे नाव असून यानिमित्ताने कोल्हापुरातील युवाशक्तीच्या सर्जनशीलतेचा आणखी एक प्रत्यय आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (मंगळवार) रात्री देशवासियांना करोना विषाणू साथीच्या जनजागृतीबाबत आवाहन केले. यावेली त्यांनी लोकांना या आजारापासून मुकाबला करण्यासाठी परस्परांत अंतर राखणे, एकमेकांपासून दूर राहणे या मुद्द्यावर भर दिला होता. त्यासाठी मोदींनी एक पोस्टर प्रेक्षकांना दाखवले होते. त्यामध्ये ‘कोरोना’ असा उल्लेख होता. त्यातील प्रत्येक शब्दाचे विस्तारीत रुप त्यामध्ये दिसत होते. तो शब्द को – कोई भी, रो – रोड पर, – ना निकले असा होता.

हा मूळ मजकूर असलेले पोस्टर कोल्हापुरातील विकास डिगे यांनी तयार केलेले आहे. त्यांनी ते जनता संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर समाज माध्यमात शेअर केले होते. २१ तारखेला त्यांनी ही पोस्ट शेअर केल्यानंतर अनेकांनी त्यांना लाईक स्वरूपात प्रतिसाद दिला होता. त्यानंतर हाच मजकूर पंतप्रधानांनी आपल्या संदेशात वापरला. पंतप्रधानांनी आपल्या भाषणादरम्यान समाज माध्यमांतून आपल्याला ही पोस्ट व त्यातील आशय मिळाला असल्याचे आवर्जून सांगितले होते. कॉपीराईटचा मुद्दा असल्याने त्यांनी थेट मूळ पोस्टरचा उल्लेख केला नाही. मात्र, त्यामध्ये काहीसा बदल केलेल्या पोस्टरचा वापर करुन त्यांनी लोकांना हा संदेश दिला. दरम्यान, पंतप्रधान कार्यालयाला आपले मूळ पोस्टर पाठवण्यात आल्याचे विकास डिगे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

समाजकार्याचा वारसा

यानिमित्ताने कोल्हापुरातील सर्जनशीलतेचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. विकास डिगे हे कोल्हापूरातील दिवंगत खासदार एस. के. डिगे यांचे नातू आहेत. डिगे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निकटचे सहकारी होते. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ राखीव असताना देशातील राखीव मतदारसंघात सर्वाधिक मतानी डिगे विजयी झाले होते. तर विकास डिगे, सदानंद डिगे यांना गतवर्षी शासनाचा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण’ पुरस्कारही मिळालेला होता.

कोल्हापूरला पंतप्रधानांची दुसरी दाद

कोल्हापुरातील सर्जनशीलतेला पंतप्रधान मोदी यांनी दुसऱ्यांदा दाद दिली आहे. ‘स्वच्छ भारत अभियाना’करिता मोदी यांनी ‘लोगो’ हवा होता. त्यासाठी देशव्यापी स्पर्धा आजोजित करण्यात आली होती. कोल्हापुरातील अनंत खासबागदार यांनी तयार केलेली गांधीजींचा चष्मा असलेली कलाकृती प्रथम विजेती ठरली होती. तर, आता करोनाच्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी विकास डिगे यांच्या पोस्टरची दखल घेतली आहे. हे दोघेही जाहिरात एजन्सीतील आहेत हाही आणखी एक योगायोग म्हणावा लागेल.