देशात लॉकडाउन लागू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना आज (५ एप्रिल) रात्री नऊ वाजता घरातील विजेवर चालणार प्रकाशदिवे बंद करून मेणबत्ती दिवे, मोबाईलची टॉर्च किंवा फ्लॅश लावण्याचं आव्हान केलं आहे. मोदी यांच्या या आवाहनावरून विरोधकांनी टीका केली. देशातील परिस्थिती गंभीर असताना दिवे कशासाठी लावायचे असंही काही नेत्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना तीन प्रश्न विचारले असून, त्याचं उत्तर देण्याचं आव्हान दिलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवे लावण्याच्या कल्पनेवर समाजवादी जनता दलाचे नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी शंका उपस्थित केली आहे. कुमारस्वामी यांनी ट्विट करून काही प्रश्नही मोदींना विचारले आहेत. “पंतप्रधानांनी धूर्तपणे देशाला भाजपाच्या स्थापना दिनाच्या पूर्वसंध्येला मेणबत्ती पेटवण्याचं आवाहन केलं आहे का? ६ एप्रिल भाजपाचा स्थापना दिन आहे, त्यामुळे या कार्यक्रमासाठी तारीख आणि वेळ का निवडली हे सांगू शकतील का? मी पंतप्रधानांना आव्हान देतो, दिवा वा मेणबत्ती लावण्यामागे एक वैज्ञानिक अथवा तर्कावर आधारित कारण त्यांनी सांगाव,” असं कुमारस्वामी यांनी म्हटलं आहे.

“अजूनही डॉक्टरांना पीपीई (स्वसंरक्षण साधनं. उदा. मास्क, कोट ) दिलेली नाहीत. दुसरीकडे नागरिकांच्या तपासणी करण्यासाठी स्वस्त किट उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. करोनाला रोखण्यासाठी सरकारनं कोणती पावलं उचलली आहेत. हे सांगण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आधीच त्रासून गेलेल्या जनतेला अर्थहीन काम करायला सांगत आहेत,” अशी टीका कुमारस्वामी यांनी केली आहे.

“राष्ट्रीय आपत्तीला ईव्हेंट स्वरूप देण हे खूप लज्जास्पद आहे. त्यापेक्षाही जास्त अपमानास्पद बाब म्हणजे जागतिक आपत्ती ओढवलेली असताना त्याआडून स्वतःच्या पक्षाचा अजेंडा राबवणं. पंतप्रधान हे समजून घेतील,” अशी सडकून टीका कुमारस्वामी यांनी केली आहे.