करोना संकटामुळे हरिद्वार येथील कुंभमेळ्यातील सहभाग प्रतीकात्मक ठेवण्यात यावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले. आता दोन शाही स्नान पार पडले आहेत. त्यामुळे कुंभमेळा प्रतीकात्मक पद्धतीने सहभाग घेऊन साजरा करावा, असे आवाहन आपण केले आहे. असे केल्यामुळे करोना विरोधातील लढ्यास मोठी शक्ती मिळेल, असे मोदी यांनी ट्वीट संदेशात म्हटले आहे.

‘‘आपण जुन्या आखाड्याचे स्वामी अवधेशानंद गिरी यांना दूरध्वनी केला होता. त्या वेळी ज्या संत, महंतांना करोनाचा संसर्ग झाला आहे त्यांच्या प्रकृतीची विचारपूसही केली. स्थानिक प्रशासनाला सहकार्य करीत असल्याबद्दल त्यांचे आभारही मानले’’, असेही पंतप्रधानांनी ट्वीट संदेशात म्हटले आहे.

कुंभमेळ्यात येऊ नका : स्वामी अवधेशानंद 

मोदी यांच्या दूरध्वनीनंतर अवधेशानंद यांनी लोकांना मोठ्या संख्येने कुंभमेळ्यात स्नानासाठी न येण्याचे आवाहन केले आहे. स्वत:चे आणि इतरांचे प्राण वाचवणे ही पवित्र गोष्ट आहे असेही अवधेशानंद यांनी म्हटले आहे.