करोनामुळे संपूर्ण देशभरात लॉकडाउन घोषित झाला आणि अनेक कामगार आपल्या घराच्या दिशेने चालू लागले. वाहतुकीचं कोणतंही साधन उपलब्ध नसल्याने अनेकांनी चालत जाण्याचा निर्णय घेतला. ३०० ते ५०० किमी अंतर चालत पार करत आपल्या घऱी सुखरुप पोहोचण्यासाठी अनेकांची धडपड सुरु आहे. पण यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. अशीच एक ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. ३८ वर्षीय रणवीस सिंह मध्य प्रदेशातील आपल्या घरी पोहोचण्यासाठी चालत निघाले होते. पण रस्त्यातच आग्रा येथे ह्रदयविकाराच झटका आला आणि त्यांना आपले प्राण गमवावे लागले. आपल्या कुटुंबाशी त्यांचं शेवटचं बोलणं झालं तेव्हा त्यांच्या तोंडी वाक्य होतं, “शक्य असेल तर मला घेऊन जाण्यासाठी या”.

रणवीर सिंह आपल्या घरापासून १०० किमी अंतर दूर होते. पण सतत चालण्यामुळे त्यांना थकवा आला होता. यामुळे ते जमिनीवर कोसळले. अखेर ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. रणवीर सिंह यांच्या जाण्याने कुटुंबावर संकट कोसळलं आहे. त्यांची पत्नी ममता आपल्या तीन मुलांचा कसा सांभाळ करायचा या विवंचनेत अडकल्या आहेत.

रणवीर यांच्या घऱाचं काम अद्यापही पूर्ण झालेलं नाही. घऱाच्या कामामुळे कुटुंब कर्जात अडकलेलं आहे. २२ मार्च रोजी ममता यांचा फोनवरुन रणवीर यांच्याशी बोलणं झालं होतं. यावेळी त्यांनी घऱी परत या अशी विनंती केली होती. “आमच्या गावातील दिल्लीत असणारी दोन मुलं पुन्हा परतत होती. त्यांनी मी येऊ शकत नाही असं सांगितलं होतं. एका रेस्तराँमध्ये ते डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होते आणि ते अजूनही सुरु होते. त्यांनी आम्हाला काळजी घेण्यास सांगितलं आणि माझी चिंता करु नका असं म्हटलं होतं,” असं ममता यांनी सांगितलं आहे.

रणवीस सिंह यांच्या पत्नी ममता (एक्स्प्रेस फोटो – गजेंद्र यादव)

रणवीर एका झोपडपट्टीत वास्तव्य करत होते. अन्नासाठी ते पूर्णपणे रेस्तराँवर निर्भर होते. घरासाठी घेतलेलं कर्ज आणि इतर खर्चासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्य़ामुळे शुक्रवारी त्यांनी आपली मोठी बहिण दीपाला फोन करुन आपण घऱी येत असल्याचं सांगितलं. तिने कसं येत आहात असं विचारलं असता रणवीर यांनी सांगितलं की, “काहीच उपलब्ध नाही आहे. ना बस सुरु आहे ना ट्रेन…चालतच येत आहे”.

पाच वाजता फोन केला तेव्हा रणवीर यांनी आपण चालत आहोत असं सांगितलं. रात्री ९ वाजता जेव्हा त्यांनी फोन केला तेव्हा काहीतरी अडचण आल्याचं जाणवत होतं. त्यांनी आपला भाऊ पिंकी सिंह याला आपल्याला एक ट्रक थोडा पुढे सोडण्यासाठी तयार झाला असल्याचं सांगितलं. “पण ते थकले होते. त्यांना झोपायचं होतं. आम्हाला तुम्ही घऱी जिवंत सुखरुप यावं असं वाटत आहे असं आम्हीत त्यांना सांगितलं,” अशी माहिती पिंकी सिंहने दिली आहे.

शनिवारी सकाळी पिंकीने पुन्हा फोन केला तेव्हा रणवीर आग्रा येथे पोहोचले होते. पण त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होत होता. आपल्या छातीत दुखत असल्याचं ते सांगत होते. घाबरल्याने पिंकी यांनी कुटुंबातील इतर सदस्यांना उठवलं नाही. त्यांनी आपल्या भावोजींना फोन केला आणि माहिती दिली. त्यांच्यातील एकाने गावातील डॉक्टरकडे धाव घेतली आणि त्यांचं आयकार्ड मिळवलं. त्याच्या सहाय्याने तो दुचाकीवरुन आग्राच्या दिशेने निघाले.

इतर चुलत भावांनी धान्याची वाहतूक करणाऱ्या जीपसाठी पोलिसांकडून पास मिळवला आणि आग्राच्या दिशेने निघाले. पण यासाठी वेळ लागला. पण जेव्हा ते आग्रा येथे पोहोचले तेव्हा रणवीर यांचा मृतदेह रुग्णालयात निपचित पडला होता. ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं पोलिसांनी त्यांना सांगितलं. यानंतर रणवीर यांचा मृतदेह गावी आणून शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.