पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वात मोठी घोषणा केली असून संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर केलं आहे. हा लॉकडाउन २१ दिवसांसाठी असणार आहे. म्हणजेच १४ एप्रिलपर्यंत हा लॉकडाउन सुरु असणार आहे. यादरम्यान लोकांना घराबाहेर पडता येणार नाही. नरेंद्र मोदींनी घराची लक्ष्मणरेषा ओलांडू नका नका असं आवाहन करताना करोना रुग्णांच्या उपचारासाठी १५ हजार कोटींची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती दिली.

Live Blog

18:23 (IST)25 Mar 2020
करोनाच्या मुकाबल्यासाठी सज्ज; 'रुग्णांसाठी राज्यभरात २२ हजार ११८ खोल्या तयार'

राज्यातील करोनाचा उपद्रव रोखण्यासाठी राज्य शासनाकडून दररोज नवनवी पावलं टाकली जात आहेत. सध्या राज्यातील करोनाग्रस्त रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागानं राज्यातील शासकीय इमारती रिकाम्या केल्या आहेत. यात जवळपास २२ हजार ११८ खोल्या रुग्णांसाठी तयार करण्यात आल्या आहेत,' अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.

16:24 (IST)25 Mar 2020
पहिल्या टप्प्यातील जणगणना, एनपीआर प्रक्रिया ढकलली पुढे

करोना विषाणूच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यापासून सुरु होणाऱ्या २०२१ च्या जनणगणनेचा पहिला टप्पा तसेच राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवहीचे (एनपीआर) अद्यावतीकरणही अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे. केंद्रीय गृहखात्याने याची माहिती दिली आहे.

16:18 (IST)25 Mar 2020
चुकूनही कॅन्सल करु नका रद्द झालेल्या रेल्वेचं तिकीट, IRCTC चं प्रवाशांना आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी(दि.२४) संपूर्ण देशात २१ दिवसांसाठी लॉकडाउनची घोषणा केली. या घोषणेनंतर रेल्वे प्रशासनानेही मेल, एक्स्प्रेस आणि पॅसेंजर रेल्वेसेवा ३१ मार्चऐवजी १४ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. प्रवासी वाहतूक बंद असली तरी देशातील मालगाड्या सुरू राहणार असल्याचं रेल्वे प्रशासनानं स्पष्ट केलंय. तर, ज्या प्रवाशांनी ऑनलाइन तिकीट काढले असतील त्यांनी तिकीट कॅन्सल करु नये असे आवाहन आयआरसीटीसीकडून प्रवाशांना करण्यात आले आहे. सविस्तर वाचा

16:06 (IST)25 Mar 2020
शेअर बाजार सावरला

सलग दुसऱ्यादिवशी शेअर बाजारातून दिलासादायक बातमी आली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८,३०० अंकांच्या पुढे तर, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक २८,५०० अंकांच्या पुढे बंद झाला. सविस्तर बातमी वाचा

16:03 (IST)25 Mar 2020
देशातील ८० कोटी लोकांना दोन रुपये किलो दरानं मिळणार गहू

करोनामुळे हातावर पोट असणाऱ्या लोकांच्या उदरनिर्वाहाचं काय? असा प्रश्न लॉकडाउनची घोषणा करण्यात आल्यानंतर उपस्थित करण्यात येत होता. यासंदर्भात केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. देशातील ८० लोकांना प्रति व्यक्तीला महिन्याला सात किलो गहू २ रुपये दरानं देणारं पुरवणार आहे. त्याचबरोबर तांदुळ ३ रुपये दरानं देणार आहे. ही जगातील सर्वात मोठी अन्न सुरक्षा योजना आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.

15:20 (IST)25 Mar 2020
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा

शेजाऱच्या पाकिस्तानात करोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. पाकिस्तानात करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १ हजार पर्यंत पोहोचली आहे. पाकिस्तानात पूर्णपणे लॉकडाउन करण्यात आलेलं नाही. सविस्तर बातमी वाचा 

15:20 (IST)25 Mar 2020
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा

शेजाऱच्या पाकिस्तानात करोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. पाकिस्तानात करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १ हजार पर्यंत पोहोचली आहे. पाकिस्तानात पूर्णपणे लॉकडाउन करण्यात आलेलं नाही. सविस्तर बातमी वाचा 

15:09 (IST)25 Mar 2020
मुंबईतील अॅन्टॉप हिल परिसरात ग‌ॅससाठी मोठी रांग

सध्या देशभरात लॉकडाऊन आहे. अशा परिस्थितीतही अनेक जण रस्त्यावर उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. दरम्यान, मुंबईतील अॅन्टॉप हिल परिसरातील सीजीएस कॉलनीत लोकांनी गॅससाठी मोठी रांग लावली होती. छायाचित्रकार गणेश शिर्सेकर यांनी टिपलेलं हे छायाचित्र
फोटो : गणेश शिर्सेकर

14:55 (IST)25 Mar 2020
अमेरिकेत एकाच दिवसात १० हजार नागरिकांना करोनाची लागण

जगभरात करोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. करोना व्हायरसचे पुढचे केंद्र अमेरिका असू शकते, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. भारतात लॉकडाउन झाल्यानंतर WHO कडून हा सूचक इशारा देण्यात आला आहे. सविस्तर बातमी वाचा

14:47 (IST)25 Mar 2020
मास्कचा काळाबाजार सुरूच; मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

करोनामुळे सॅनिटायझर आणि मास्कच्या मागणीमध्ये प्रचंढ वाढ झाली आहे. या वस्तुंची टंचाई निर्माण होणार नाही, याची खबरदारी राज्य सरकारकडून घेतली जात असताना मास्क आणि इतर वस्तुंचा काळाबाजार सुरू असल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी विमानतळाजवळील एका गोदामावर धाड टाकत ४ लाख मास्क जप्त केले आहेत. याची किंमत जवळपास एक कोटी रूपये आहे.

14:32 (IST)25 Mar 2020
करोना बंदीतला ‘जुगाड’ : दुकानातील गर्दी टाळण्यासाठी ‘मॅन टू मॅन मार्किंग’

करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २१ दिवसांसाठी संपूर्ण देशात लॉकडाउनची घोषणा केली. करोनाला रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग ठेवणे हा एकमेव उपाय असल्याचे मोदींनी सांगितले. सर्व जनतेने पुढील २१ दिवस घरातच राहावे अशी विनंती मोदींनी देशातील लोकांना केली. दरम्यान, मोदींच्या भाषणानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांसह देशातील काही शहरांतील दुकानदारांनी खरेदीसाठी बाहेर पडलेल्या लोकांमध्ये गर्दी होऊ नये आणि त्यांच्यात ‘सुरक्षित अंतर’ राहावे यासाठी एक जुगाड शोधल्याचं समोर आलंय. सविस्तर वाचा  

14:29 (IST)25 Mar 2020
पंकजा मुंडे उभारणार नाही गुढी

करोनाच्या संकटानं संपूर्ण देश लॉकडाउनमध्ये गेला आहे. वेगान होत असलेला संसर्ग आणि करोनाग्रस्तांची वाढत असलेली संख्या देशाच्या चिंतेत भर घालत आहे. महाराष्ट्रातही चिंताजनक परिस्थिती निर्माण होण्याआधीच संचारबंदी करण्यात आली. त्यामुळे मराठी नव वर्षांचा उत्साह कमी दिसून येत आहे. अनेक नेत्यांनी, सेलिब्रिटींनी गुढी उभारतानाचे फोटो शेअर केले. पण, भाजपाच्या नेत्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी गुढी न चढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर एक निर्धारही त्यांनी केला आहे.

क्लिक करा - आज गुढी चढवणार नाही; पंकजा मुंडे यांनी केला निर्धार

14:20 (IST)25 Mar 2020
राज्यातील करोनाग्रस्तांनी संख्या ११६ वर

राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या ११६ वर पोहोचली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत माहिती दिली. यापूर्वी सकाळी सांगलीमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर हा आकडा वाढून ११२ वर पोहोचला होता. त्यानंतर आता राज्यात आणखी ४ नव रूग्ण सापडले आहेत.

13:12 (IST)25 Mar 2020
करोना व्हायरस हा छुपा शत्रू, त्याला हरवण्याचा संकल्प करा : उद्धव ठाकरे

करोना व्हायरस हा छुपा शत्रू आहे, तो कुठून हल्ला करेल हे सांगता येत नाही. घराबाहेर पाऊल आपण टाकलं तर शत्रू आपल्या घरात पाऊल टाकेल हे विसरु नका. या करोनाला हरवण्याा संकल्प करा असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. घरांमध्ये लोक एकत्र आले आहेत. घरातले एसी बंद करा, घरातल्या खिडक्या दरवाजे उघडा असंही आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. à¤•à¤¾à¤² काहीशी गोंधळाची परिस्थिती होती. त्यामुळे मी सकाळी शुभेच्छा द्यायला आलो नाही, तर दुपारी आलो असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. 

13:06 (IST)25 Mar 2020
सकाळी आलो असतो, तर छातीत धस्स झालं असतं – उद्धव ठाकरे

“काल रात्री थोडी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. अस्वस्थतात होती. त्यात मी आज सकाळी आलो असतो, तर आता काय सांगणार, छातीत धस्स झालं असतं. त्यामुळे सकाळी आलो नाही. आज मी काही नकारात्मक सांगणार नाहीय. तुम्हाला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे” असे मख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. “जनतेला आता संकटाच्या गांभीर्याची कल्पना आली आहे आतापर्यंत आपण नकारात्मक बघत होता. घराबाहर पडू नका हे, मी आधीच सांगितलं आहे"

12:45 (IST)25 Mar 2020
काहीही झालं घराबाहेर पडू नका - मुख्यमंत्री

आज मी निगेटिव्ह बोलणार नाही. अनेक दिवसांनी सर्व कुटुंब एकत्र आले आहे. शत्रू मोठा आहे. तो दिसत नाही. घराबाहेर पडलो तर तो कधीही हल्ला करेल. आपण बाहेर पडलो तर तो आपल्या घरात येईल. अनेक जण एकत्र आलेत. आपण आजपर्यंत जे गमावलं होतं ते या निमित्तानं वापरतो. शक्यतो एसी बंद करा असं केंद्राकडून सांगितलं आहे. आम्ही हे सुरू केलंय असं सांगितलं, असं मुख्यमंत्री म्हणाले.

12:38 (IST)25 Mar 2020
होम क्वारंटाइनमध्ये असलेल्या महिलेचा मृत्यू

कर्नाटकातील चिक्काबल्लापूर १५ मार्चपासून होम क्वारंटाइनमध्ये असलेल्या एका महिलेचा मृत्यू झाला आहे. ही महिला मक्का येथून आली होती. श्वसनासंबंधीच्या त्रासामुळे या महिलेचा मृत्यू झाला. तिच्या Covid-19 च्या रिपोर्टची प्रतिक्षा आहे. कर्नाटकचे आरोग्यमंत्री बी. श्रीरामुलु यांनी ही माहिती दिली. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

11:42 (IST)25 Mar 2020
संयुक्त राष्ट्राकडून मोदींचे कौतुक


करोना व्हायरस विरोधातील लढयात आम्ही सुद्धा तुमच्यासोबत एकजुटीने उभे आहोत, असे संयुक्त राष्ट्राकडून भारताला सांगण्यात आले आहे. २१ दिवस लॉकडाउन घोषित करण्याच्या मोदींच्या निर्णयाचे संयुक्त राष्ट्राने कौतुक केले आहे. करोनाला रोखण्यामध्ये हा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय असल्याचे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे.

11:18 (IST)25 Mar 2020
आरोग्याचं भरभराटीचं चित्र यावं हीच सदिच्छा – राज ठाकरे

वसुधैव कुटुम्बकम' अर्थात वैश्विक कुटुंबाच्या ह्या काळात संपूर्ण जग एकत्रितपणे एका संकटाशी झुंज देत आहे. ह्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने ह्या संकटाच्या छायेची तीव्रता कमी कमी होत सर्वत्र पुन्हा एकदा आरोग्याचं, भरभराटीचं वातावरण येवो, हीच सदिच्छा.

11:14 (IST)25 Mar 2020
आदेश न पाळल्यास दिसता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देऊ - चंद्रशेखर राव

"नागरिक घराबाहेर पडल्यास त्यांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देऊ," असा स्पष्ट इशारा तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी दिला आहे. "मी नागरिकांना विनंती करतो की अशी वेळ येऊ देऊ नका," असंही ते म्हणाले.

10:51 (IST)25 Mar 2020
सांगलीत करोनाचे पाच रूग्ण

सांगलीत करोनाचे आणखी पाच रूग्ण सापडले आहे. एकाच कुटुंबातील पाच जण चार करोनाग्रस्तांच्या संपर्कात आल्यानं त्यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. त्यांचे नमूने चाचणीसाठी पाठवल्यानंतर ते पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या ११२ वर पोहोचली आहे.

10:39 (IST)25 Mar 2020
जम्मू काश्मीरमध्ये रस्त्यावर बसण्याची शिक्षा

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बंदचे नियम केले असून जे हे नियम पाळत नाहीत अशांना जम्मू व काश्मीरमध्ये अनोखी शिक्षा देण्यात येत आहे. त्यांना सोशल डिस्टन्स म्हणजे ठराविक अंतर राखत आखलेल्या वर्तुळामध्ये बसण्याची शिक्षा देण्यात येत आहे.

10:16 (IST)25 Mar 2020
दरवर्षीसारखा यंदा सण साजरा करता येणार नाही

'आपल्या देशाचा करोना व्हायरस विरुद्ध लढा सुरु असताना यंदा सण आले आहेत. दरवर्षीसारखा यंदा आपल्याला सण साजरा करता येणार नाही. पण त्यामुळे या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा आपला संकल्प अधिक मजबूत होणार आहे. करोना विरुद्ध आपण सर्व जण मिळून ही लढाई लढू. आजपासून नवरात्र सुरु होत आहे. मी गेल्या अनेक वर्षांपासून देवीची पूजा करतोय. यंदा मी मानवतेची उपासना करणारे डॉक्टर, नर्सेस, पोलीस आणि मीडिया कर्मचारी यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतो' असे मोदींनी त्यांच्या टि्वटमध्ये म्हटले आहे.


10:08 (IST)25 Mar 2020
आवश्यक त्या मदतीसाठी स्वयंसेवक तयार - मोहन भागवत

'शासन आणि प्रशासनाच्या प्रत्येक आवश्यक त्या मदतीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक तयार आहेत. देशातील नागरिकांच्या मदतीसाठी सर्व आवश्यक त्या वस्तूंचा पुरवठा करण्याचं काम पोलीस आणि प्रशासनाच्या मदतीनं स्वयंसेवकांनी सुरू केलं आहे. आपण सर्वांनी यावेळी नियमांचं कठोरपणे पालन केलं पाहिजे, अस मोहन भागवत म्हणाले. प्रतिपदेच्या भाषणादरम्यान ते बोलत होते. 

सविस्तर वाचा - संकटाचा एकत्रित सामना करण्याची गरज; स्वयंसेवक मदतीसाठी तयार : मोहन भागवत

10:05 (IST)25 Mar 2020
पंतप्रधान मोदींनी दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदू नवर्ष गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मराठीजनांच्या नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्याने होते. तुम्हाला आनंद, समृद्धी यासोबतच चांगले आरोग्य लाभो असे मोदींनी त्यांच्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

10:03 (IST)25 Mar 2020
क्रिकेटविश्वाचा मोदींच्या लॉकडाउनला पाठिंबा

पंतप्रधानांच्या घोषणेला सर्व स्तरातून प्रतिसाद मिळाला. क्रिकेट विश्वातील भारताचा कर्णधार विराट कोहली, हरभजन सिंग, चेतेश्वर पुजारा आणि अनिल कुंबळे यांनी या निर्णयाचे समर्थन केले.

वाचा काय म्हणाले क्रिकेटपटू

09:44 (IST)25 Mar 2020
पुणे : आणखी तिघांना सोडणार - महापौर

पुण्यातील नायडू रुग्णालयात १० तारखेला आणखी ३ जण बाधित आढळले होते. त्या तिघांची पहिली तपासणी निगेटिव्ह आली असून आता दुसर्‍या तपासणीचा रिपोर्ट आज संध्याकाळी मिळणार आहे. तो निगेटिव्ह आल्यास त्यांना उद्या सोडण्यात येणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

09:36 (IST)25 Mar 2020
करोनाचा वेग मंदावण्याचे संकेत

सरकारच्या उपायोजनांमुळे करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्याही कमी होत आहे. सोमवारी ९९ जणांचे करोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यातुलनेत मंगळवारी ६४ जणांचा करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. करोनाचा वेग मंदावण्याचे हे संकेत आहेत.

09:08 (IST)25 Mar 2020
करोनाच्या ४८ रुग्णांना डिस्चार्ज

करोना व्हायरससंबंधी दररोज चिंता वाढवणाऱ्या बातम्या येत असताना आता एक दिलासा देणारी बातमी सुद्धा समोर आली आहे. देशाच्या वेगवेगळया भागातील करोना बाधित ४८ रुग्णांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

08:59 (IST)25 Mar 2020
पुण्यातील 'त्या' दोघांना आज डिस्चार्ज

पुण्यातील पहिल्या दोन करोनाग्रस्त रूग्णांना आज रूग्णालयातून सोडण्यात येणार आहे. पहिल्यांदा त्याचे नमूने चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यानंतर रिपोर्ट निगेटिव्ह आले. त्यानंतर पुन्हा एकदा नमूने चाचणीसाठी पाठवण्यात आले. दुसऱ्यांदाही त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. त्यामुळे आज त्यांना रूग्णलायतून सोडण्यात येणार आहे.

08:50 (IST)25 Mar 2020
तामिळनाडूत करोनाग्रस्ताचा मृत्यू

देशात करोनाचा प्रदुर्भाव वाढत आहे. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशात २१ दिवसांचं लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं आहे.सध्या देशातील करोनाग्रस्तांचा आकडा ५५० वर पोहोचला आहे. दरम्यान, तामिळनाडूनतील एका करोनाग्रस्ताचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर मदुराईतील राजाजी रूग्णलायात उपचार सुरू होते.