करोनाचा फैलाव होऊ नये यासाठी देशभरात लागू करण्यात आलेला लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. करोनाची परिस्थिती अद्यापही नियंत्रणात आली नसल्याने १४ एप्रिल रोजी संपणारा लॉकडाउन ३ मेपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. करोनाचा पराभव करायचा असेल तर घऱात थांबणे आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणे अत्यंत महत्त्वाचं असल्याचं सरकार आणि आरोग्य विभाग वारंवार सांगत आहे. मात्र अद्यापही अनेक ठिकाणी लोक नियमांचं सर्रासपणे उल्लंघन करताना दिसत आहे. अशीच एक धक्कादायक घटना तामिळनाडूत समोर आली आहे.

करोनाची लागण होऊ नये यासाठी लोकांना घऱात थांबण्याचं आवाहन केलं जात असताना तामिळनाडूत एका बैलाच्या अंत्यसंस्कारासाठी हजारोंच्या संख्येने लोक एकत्र जमल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तामिळनाडू पोलिसांनी याप्रकरणी तीन हजार लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मदुराईमध्ये हा प्रकार घडला आहे.

आणखी वाचा- Video: पोलिसांनी रस्त्यात ऑटो थांबवली; डिस्चार्ज मिळालेल्या पित्याला तो उचलून घरी घेऊन गेला

मदुराईचे जिल्हाधिकारी टी जी विनय यांनी दिलेल्या माहितीनुसार, “१२ एप्रिल रोजी मदुराईमध्ये एका बैलावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित असणाऱ्या तीन हजार जणांविरोधात लॉकडाउनच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे”.

आणखी वाचा- पिझ्झा डिलिव्हरी करणाऱ्याला करोनाची लागण; ७२ जण क्वारंटाइनमध्ये

करोना व्हायरस महामारीमुळे भारतामध्ये आतापर्यंत ४१४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर करोना बाधितांची संख्या १२, ३८० झाली आहे. गेल्या २४ तासांमध्ये भारतामध्ये ३७ जणांचा मृत्यू झाल्यामुळे भारतामध्ये चिंतेचे वातावरण आहे. यापैकी १४८९ रुग्णांना घरी पाठवण्यात आलं आहे. तर १० हजार ४४७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.