रेल्वेच्या ३६६ श्रमिक गाडय़ांनी प्रवास

नवी दिल्ली : टाळेबंदीच्या काळात विविध भागांत अडकून पडलेल्या सुमारे ४ लाख स्थलांतरित कामगारांना एकूण ३६६ श्रमिक विशेष रेल्वे गाडय़ांद्वारे त्यांच्या मूळ राज्यांत नेऊन सोडण्यात आले आहे.

यातील २८७ गाडय़ा अगोदरच अपेक्षित ठिकाणी पोहोचल्या असून ७९ गाडय़ा अद्याप प्रवास मार्गावर आहेत. २८७ गाडय़ापैकी १२७ उत्तर प्रदेशात, ८७ बिहारमध्ये, २४ मध्य प्रदेशात, २० ओडिशात, १६ झारखंडमध्ये, चार राजस्थानात, तीन महाराष्ट्रात, तर तेलंगण व पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी दोन गाडय़ा गेल्या आहेत. आंध्र व हिमाचल प्रदेशात प्रत्येकी एक गाडी गेली आहे. या गाडय़ांच्या मदतीने तिरुचिरापल्ली, तितलागड, बरौनी, खांडवा, जगन्नाथपूर, खुर्दा रोड, छाप्रा, बलिया, गया, पुर्णिया, वाराणसी येथे लोकांना सोडण्यात आले.

आणखी ४६ गाडय़ा सोडण्यात येणार आहेत. प्रत्येक श्रमिक विशेष गाडीला २४ डबे आहेत.

मालदीवमधून ६९८ भारतीय मायदेशी

कोची : भारतीय नौदलाचे आयएनएस जलश्वा हे जहाज ६९८ भारतीय नागरिकांना घेऊन मालदीव येथून कोचीन बंदरावर दाखल झाले. नौदलाची टाळेबंदी काळातील परदेशात जाऊन केलेली पहिली मोहीम त्यामुळे यशस्वी झाली आहे.

लंडनमधून ३२९ भारतीय मुंबईत

मुंबई : टाळेबंदीमुळे लंडन येथे अडकून पडलेले ३२९ भारतीय शनिवारी मध्यरात्री एअर इंडियाच्या विमानाने मुंबईत दाखल झाले. विविध देशांमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी विशेष विमान फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. लंडनमध्ये अडकलेल्या ३२९ भारतीयांना घेऊन एअर इंडियाचे विमान शनिवारी मध्यरात्री १.३० च्या सुमारास मुंबईत दाखल झाले. मुंबई विमानतळावर या सर्वाची तपासणी करण्यात आली असून, २४८ प्रवाशांना मुंबईतील विविध हॉटेल्समध्ये ठेवण्यात आले आहे. तर ६५ जण पुण्याला, १६ जण औरंगाबाद, बीड, गोवा, गोंदिया या ठिकाणी रवाना झाले. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसने या प्रवाशांची इच्छितस्थळी रवानगी करण्यात आली. तर २४८ प्रवाशांना विमानतळावरून मुंबईतील विविध हॉटेल्समध्ये पाठविण्यासाठी बेस्टच्या बसची व्यवस्था करण्यात आली.