लॉकडाउनमुळे देशभरात अडकलेल्या स्थलांतरित मजुरांसाठी रेल्वेकडून विशेष श्रमिक ट्रेन सोडल्या जात असून आतापर्यंत २६०० ट्रेन्समधून ३५ लाख स्थलांतरित मजुरांनी प्रवास केला आहे. तर राज्यांतर्गंत चालवण्यात आलेल्या ट्रेनमधून १० लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. म्हणजेच आतार्यंत ४५ लाख प्रवाशांनी ट्रेनने प्रवास केला आहे. १ मे पासून सुरु करण्यात आलेल्या विशेष ट्रेनमधून प्रवास केलेल्यांमध्ये ८० टक्के प्रवासी उत्तर प्रदेश आणि बिहारचे असल्याची माहिती रेल्वे बोर्डाचे चेअरमन विनोद कुमार यांनी दिली आहे.

“राज्यांतर्गत ट्रेन चालवालयी असल्यास राज्य सरकारने विनंती केल्यानंतर लगेचच ट्रेन सुरु केली जाईल. राज्य सरकारसोबत आम्ही त्यासाठी समन्वय साधत आहोत. काही राज्यांमध्येही ट्रेन चालवण्यात आल्या असून यामध्ये एकूण १० लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. यामुळे दुसऱ्या राज्यांमध्ये प्रवास करणारे ३५ लाख आणि राज्यांतर्गत १० लाख अशा एकूण ४५ लाख प्रवाशांनी ट्रेनमधून प्रवास केला असल्याचं,” विनोद कुमार यादव यांनी सांगितलं आहे.

“१ मे रोजी पहिली श्रमिक ट्रेन चालवली तेव्हा फक्त चार ट्रेन चालवण्यात आल्या ज्यामध्ये चार हजार प्रवासी होते. २० मे रोजी सर्वात जास्त २७९ ट्रेन चालवण्यात आल्या. त्यावेळी चार लाख लोकांनी प्रवास केला. तर गेल्या चार दिवसांत २६० ट्रेन चालवण्यात आल्या असून साडे तीन लाख लोकांनी प्रवास केला आहे,” अशी माहिती विनोद कुमार यादव यांनी दिली आहे.

आणखी वाचा- Lockdown : देशभरातून 13 लाख 54 हजार पेक्षाही अधिकजण उत्तर प्रदेशला परतले

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “सर्व प्रवाशांसाठी मोफत अन्न आणि पाण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. सर्व ट्रेन आणि स्थानकांध्ये सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जात असून स्वच्छतेची काळजीही घेतली जात आहे. आम्ही पाच हजार डब्यांचं रुपातंर केअर सेंटरमध्ये रुपांतर केलं असून ८० हजार बेड्स आहेत. यामधील काहींचा वापर होत नसल्याने श्रमिक ट्रेनसाठी ते वापरले जात आहे. गरज लागली तर पुन्हा केअर सेंटरसाठी त्यांचा वापर करण्यात येईल”.

परिस्थिती पुन्हा एकदा सुरळीत होण्यासाठी रेल्वे प्रयत्न करत असून १ जून पासून २०० मेल एक्स्प्रेस चालवल्या जाणार असल्याची माहिती विनोद कुमार यादव यांनी दिली आहे.