दिल्लीत करोनाची परिस्थिती अद्यापही नियंत्रणात नसून जुलै महिन्याच्या अखेरीस राजधानीत साडे पाच लाख रुग्ण असतील अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी सध्याच्या डबलिंग रेट पाहता ही भीती व्यक्त केली आहे. दिल्ली सरकारने बाहेरी रुग्णांची तपासणी न करण्याचा निर्णय जाहीर केला होता. पण नायब राज्यपालांनी निर्णय रद्द केला. यामुळे रुग्णायतील बेड्सच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यताही मनिष सिसोदिया यांनी व्यक्त केली आहे.

करोना रुग्णांची संख्या दर १२ ते १३ दिवसांनी दुपटीने वाढत आहे असं मनिष सिसोदिया यांनी सांगितलं आहे. नायब राज्यपाल अनिल बैजाल आणि काही वरिष्ठ केंद्रीय अधिकाऱ्यांसोबत पार पडलेल्या बैठकीनंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. “३१ जुलैपर्यंत दिल्लीत साडे पाच लाख करोनाचे रुग्ण असतील. तसंच ८० हजार बेड्सची गरज भासणार आहे,” असं मनिष सिसोदिया यांनी यावेळी सांगितलं.

आणखी वाचा- गोव्यात प्रवेश करणाऱ्यांसाठी करोना चाचणीच्या नियमात बदल, नवी नियमावली जाहीर

दिल्ली सरकारने जी शक्यता दर्शवली आहे त्यानुसार, १५ जूनपर्यंत ४४ हजार तर ३० जूनपर्यंत १ लाख रुग्ण असतील. १५ जुलै रोजी ही संख्या अडीच लाखांवर पोहोचलेली असेल. मनिष सिसोदिया यांनी यावेळी आपण नायब राज्यपालांकडे आपण घेतलेल्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची विनंती केल्याचं सांगितलं. पण नायब राज्यपालांना त्यास नकार देत बैठकीत चर्चाही केली नाही असं मनिष सिसोदिया यांनी सांगितलं आहे. दिल्ली सरकारने राज्यातील रुग्णालयं फक्त राज्यातील नागरिकांसाठीच राखीव असतील असा निर्णय घेतला होता.

आणखी वाचा- करोनाची लक्षणं दिसल्यानं ज्योतिरादित्य शिंदे यांना रुग्णालयात केलं दाखल

“दिल्लीत येणाऱ्या दिवसांमध्ये ८० हजार बेड्सची गरज लागण्याची शक्यता आहे. तेदेखील फक्त दिल्लीवासियांसाठी लागणार आहेत. अशा परिस्थितीत बाहेरुन येणाऱ्यांसाठी बेड्स कुठून आणायचे ?,” अशी विचारणा मनिष सिसोदिया यांनी केली आहे.