करोना व्हायरस महामारीचे परिणाम आता हळूहळू दिसायला सुरूवात झाली असून बहुतांश देशांमध्ये लॉकडाउन असल्याने अनेक कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागतोय. हॉटेल आणि ट्रान्सपोर्ट व्यवसायाशी निगडीत कंपनी Airbnb Inc ने जवळपास 1900 कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केले आहे. करोना व्हायरसमुळे आर्थिक संकटातून जात असल्याने कंपनीने आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी 25 टक्के कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतलाय.

“सध्या आम्ही अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहोत. नागरिकांचा प्रवास पूर्णपणे बंद असल्याने त्याचा चांगलाच फटका कंपनीला बसला आहे. 2019 मध्ये जेवढी कमाई झाली होती त्याच्या निम्मी कमाईही या वर्षी झालेली नाही”, असं निवेदन देत कंपनीचे सीईओ ब्रायन चेस्की यांनी 1900 कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करत असल्याचे जाहीर केले.  वृत्तसंस्था Reuters ने मंगळवारी याबाबतचे वृत्त दिले.

कामावरुन कमी केलेल्या या कर्मचाऱ्यांना 14 आठवड्यांचा बेसिक पे दिला जाईल, याशिवाय कर्मचाऱ्याने कंपनीत जितके वर्ष काम केलं असेल तितक्या आठवड्यांचा अतिरिक्त वेगळा पगार दिला जाईल. म्हणजे जर कर्मचारी 10 वर्षांपासून कंपनीत काम करत असेल तर त्याला 10 आठवड्यांचा अतिरिक्त पगार दिला जाईल, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. अमेरिका आणि कॅनडामधून कामावरुन काढलेल्या कर्मचाऱ्यांचा 11 मे हा अखेरचा दिवस असेल. नोकरीवरुन कपात करण्याआधी Airbnb Inc मध्ये काम करणाऱ्यांची संख्या एकूण 7,500 होती.