सध्या करोनामुळे देशभरात लॉकडाउन आहे. सर्वांना घरात थांबण्याचा आदेश दिला असताना एकीकडे रस्त्यावर पोलीस कायदा आणि सुव्यवस्था राखत असताना सीमारेषेवरही आपले जवान तैनात आहेत. देशातील वाहतूक पूर्पपणे ठप्प आहे. जीवनाश्यक गोष्टी वगळता अत्यंत गरजेचं असल्यास प्रशासनाच्या परवानगीशिवाय कोणलाही रस्त्यावर उतरण्याची परवानगी नाही. अशातच एक वयोवृद्ध दांपत्य आपल्या मुलाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी २००० किमीच्या प्रवासाला निघाले आहेत.

कर्नल नवजोत सिंह बल यांचा गुरुवारी बंगळुरुत कॅन्सरमुळे मृत्यू झाला. ३९ वर्षीय नवजोत यांना शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. आपल्या मुलाला अखेरचा निरोप देण्यासाठी नवजोत सिंह बल यांचे आई-वडील २००० किमीच्या प्रवासाला निघाले आहेत. आपल्या मुलाच्या निधनाची बातमी समजल्यानंतर दांपत्य गुरुग्राम येथून बंगळुरुच्या प्रवासाला निघाले आहे. विमानसेवा तसंच रेल्वे सेवा बंद असल्याने हे दांपत्य रस्त्याने बंगळुरुला निघालं आहे.

आणखी वाचा- सलाम! चार वर्षाच्या मुलीला कॅन्सरची औषधं पोहोचवण्यासाठी त्याचा बाईकवरुन १५० किमीचा प्रवास

सध्या प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद असून लष्कराच्या विमानासाठी विनंती करण्यात आली होती. पण यासंबंधी कोणतीही ऑर्डर न मिळाल्याने विमानाची सोय होऊ शकली नाही. सध्या लॉकडाउनमुळे अशा परिस्थितीत गृहमंत्रालयाकडून परवानगी मिळणं आवश्यक आहे. गुरुवारी संध्याकाळी यासंबंधी परवानगी मिळाली. पण भारतीय हवाई दलाला कोणताही आदेश देण्यात आला नव्हता. यामुळे कुटुंबाला अखेर रस्त्याने प्रवास करण्याचा पर्याय निवडला. सोबतच त्यांनी बंगळुरुतच अंत्यसंस्कार करण्याची इच्छा व्यक्त केली.

आणखी वाचा- पोलिसांच्या सुरक्षेत भाजपा आमदाराचं जंगी बर्थडे सेलिब्रेशन, गर्दीला समजावलं सोशल डिस्टन्सिंगचं महत्त्व

शुक्रवारी सकाळी नवजोत सिंह बल यांच्या आई-वडिलांनी प्रवासाला सुरुवात केली असून शनिवारी संध्याकाळी ते पोहोचतील. रस्त्याने जात असल्याने त्यांना २००० किमीचा टप्पा गाठावा लागणार आहे. कर्नल नवजोत सिंह बल यांना जम्मू काश्मीरमधील मोहिमेतील कामगिरीसाठी शौर्य पुरस्कारने सन्मानित करण्यात आलं होतं. ते स्पेशल फोर्स ऑफिसर होते. एक वर्षापूर्वी त्यांना आपल्याला कॅन्सर झाला असल्याची माहिती मिळाली होती. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी आणि दोन मुलं आहे.