केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या २० लाख कोटींच्या पॅकेजची सविस्तर माहिती देत पत्रकार परिषद घेत आहेत. यावेळी निर्मला सीतारामन यांनी स्थलांतरित मजूर आणि शेती क्षेत्रासंबंधी केलेल्या घोषणांवर बोलताना आयटी कंपनी विप्रोचे अध्यक्ष आणि  संस्थापक अझीम प्रेमजी यांनी मनरेगाचा विस्तार करण्याचा निर्णय सर्वात महत्त्वाचा असल्याचं म्हटलं आहे. यावेळी त्यांना गरीब कुटुंबाना तात्काळ मदत करण्याचा सल्लाही दिला आहे. अझीम प्रेमजी यांनी कोरोनाविरोधात लढण्यासाठी ११२५ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. ET मध्ये लिहिलेल्या लेखात त्यांनी करोनाच्या परिस्थितीवर आपलं मत मांडलं आहे.

“मनरेगाचा विस्तार करण्याचा निर्णय सर्वात महत्त्वाचं पाऊल आहे. साडे तीन महिन्यांसाठी रेशन सुविधा सार्वत्रिक आणि दुप्पट करण्याची गरज आहे. तसंच दारोदारी जाऊन धान्य वाटप केलं पाहिजे. धान्यासोबत तेल, डाळी, मीठ, मसाला, सॅनिटरी पॅड यांचंदेखील अतिरिक्त वाटप केलं पाहिजे,” असं अझीम प्रेमजी यांनी म्हटलं आहे.

तीन महिन्यांसाठी गरीबांच्या खात्यात तीन हजार रुपये –
अझीम प्रेमजी यांनी ग्रामीण विभागासाठी तात्काळ पाऊलं उचलणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त केलं आहे. “प्रत्येक गरीब कुटुंब किंवा स्थलांतरित मजुरांना तात्काळ आर्थिक मदत देण्याची गरज असून, सात हजार रुपयांची मदत पुढील तीन महिन्यांसाठी केली पाहिजे,” असं त्यांनी सांगितलं आहे.

स्थलांतरिक मजुरांसंबंधी बोलताना अझीम प्रेमजी यांनी विनाकारण होणारे मृत्यू अक्षम्य शोकांतिका असल्याचं म्हटलं आहे. अनेक राज्य सरकारांनी कामगार कायदे रद्द करणे आपल्यासाठी खूप मोठा धक्का असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. अझीम प्रेमजी यांनी अडकलेल्या तसंच स्थलांतरित मजुरांना प्रवास करण्यासाठी संपूर्ण स्वायत्तता आणि स्वातंत्र्य दिलं पाहिजे असं सांगताना करोनाचा फैलाव होणार नाही याची काळजीही घेतली पाहिजे असं सांगितलं आहे. “कोणावरही थांबण्यासाठी किंवा पुन्हा त्यांच्या राज्यात जाण्यासाठी जबरदस्ती केली जाऊ नये. स्थलांतरित मजुरांना ट्रेन किंवा बसमधून मोफत प्रवास करण्यासाठी परवानगी दिली पाहिजे,” असं अझीम प्रेमजी यांनी म्हटलं आहे.

जगातील अव्वल दहा दानशूर व्यक्तीमध्ये फक्त अझीम प्रेमजी यांचा समावेश असून त्यांनी १००० कोटींची मदत दिली आहे. करोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी मदत करणाऱ्यांच्या यादीत अझीम प्रेमजी जगात तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

अझीम प्रेमजी फाऊंडेशनसोबत विप्रो आणि विप्रो एंटरप्राइज यांच्याकडूनही मदत देण्यात आली असून एकूण रक्कम ११२५ कोटी इतकी झाली आहे. विप्रो १०० कोटी देत असून विप्रो इंटरप्रायजेस २५ कोटींची मदत आहे अझीम प्रेमजी फाउंडेशनकडून १००० कोटी रुपये दान करण्यात आले आहेत.