पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली असून जाहीर करण्यात आलेल्या पॅकेजमध्ये राज्यांसाठी काहीच नसल्याचं म्हटलं आहे. तसंच हे पॅकेज एक मोठा शून्य असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकार करोना संकटात लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
“केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलेलं पॅकेज दुसरं काही नसून एक मोठा शून्य आहे. लोकांच्या डोळ्यात धूळ फेकत त्यांची दिशाभूल केली जात आहे. असंघटित क्षेत्र तसंच रोजगार निर्मितीसाठी या पॅकेजमध्ये काहीच नाही,” अशी टीका ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
“पंतप्रधानांनी २० लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं तेव्हा आम्हाला त्यात राज्यांसाठी काही मदत दिली असावी अशी अपेक्षा होती. वित्तीय जबाबदारी आणि अर्थसंकल्प व्यवस्थापनासंबंधीही (एफआरबीएम) काही अपेक्षा होत्या. पण आज केंद्रीय अर्थमंत्र्यांनी घोषणा केल्यानंतर नरेंद्र मोदींनी सांगितलेलं सगळं दिशाभूल होती असं लक्षात आलं,” असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. आर्थिक नुकसान झेलणाऱ्या राज्यांना कोणतीही मदत न दिल्याबद्दल ममता बॅनर्जी यांनी संताप व्यक्त का आहे. सहकारी संघराज्य व्यवस्थेची गळचेपी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 13, 2020 8:48 pm