काँग्रेसची सत्ता असणाऱ्या पंजाबमधून रविवारी स्थलांतरित मजुरांना घेऊन विशेष ट्रेन रवाना झाली. भटिंडा स्थानकावरुन सुटलेल्या या ट्रेनमधील प्रवाशांना यावेली काँग्रेस आमदाराकडून पत्रक वाटण्यात आलं. या पत्रकांमध्ये लिहिण्यात आलं होतं की, “सोनिया गांधींनी तुमच्या तिकीटाचे पैसे दिले आहेत”. काँग्रेस आमदार अमरिंदर यांनी या पत्रकांचं वाटप केलं. यावेळी त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. ही ट्रेन बिहारमधील मुझफ्फरपूरसाठी रवाना झाली. मात्र ट्रेन निघण्याआधी अमरिंदर राजा यांनी मजुरांना कोणी मदत केली आहे याची माहिती असावी याची खात्री करुन घेतली.

ट्रेन निघण्याआधी काँग्रेस आमदार अमरिंदर यांनी रेल्वे स्थानकावर भाषणही केलं. यावेळी त्यांनी सोनिया गांधी यांनी प्रत्येक गरजू कामगार आणि मजुराला मदत करण्याचं जाहीर केल्याचा उल्लेख करत सर्वांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. “तुमच्या तिकीटाचे पैसे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी दिले आहेत. काँग्रेस पक्ष, मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि प्रदेशाध्यक्ष सुनील जाखर यांनी तुमच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. हे सर्व पत्रकात लिहिलं आहे. परतीच्या प्रवासात तुम्ही हे पत्रक वाचू शकता,” असं काँग्रेस आमदार अमरिंदर यावेळी सांगत होते.

आणखी वाचा- “तुमच्या कार्यकाळात करोना आला असता तर…”; ते ट्विट करणाऱ्या संबित पात्रांविरोधात गुन्हा दाखल करा, काँग्रेसची मागणी

गरजेच्या वेळी काँग्रेस धावून येते असं या पत्रकाच्या सुरुवातीला लिहिण्यात आलं आहे. ट्रेन सुटण्याआधी अमरिंदर यांनी खिडकीतून सर्व प्रवाशांना हे पत्रक वाटलं. एखाद्या राजकीय नेत्याने अशा पद्धतीने स्थानकावर प्रचार करण्याची ही कदाचित पहिलीच वेळ आहे.

मजुरांना वाटण्यात आलेलं पत्रक

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी स्थलांतरित मजुरांकडे तिकीटाचे पैसे घेणं चुकीचं असल्याची टीका करताना आपला पक्ष सगळा खर्च उचलेल असं जाहीर केलं होतं. यानंतर केंद्राने स्पष्टीकरण देत रेल्वे मंत्रालय ८५ टक्के रक्कम भरत असून राज्य उर्वरित १५ टक्के देऊ शकतात असं स्पष्ट केलं होतं.