भारतात करोनाची परिस्थिती अद्यापही नियंत्रणात आलेली नसून रुग्णसंख्येत रोज वाढ होताना दिसत आहे. भारत सध्या करोनाबाधित देशांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी करोनाच्या स्थितीवरुन पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. भविष्यात हॉवर्डमध्ये जेव्हा अपयशावर अभ्यास केला जाईल तेव्हा या तीन गोष्टींचा उल्लेख असेल असा टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे.

राहुल गांधी यांनी ट्विटरला नरेंद्र मोदींचा व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळी राहुल गांधी यांनी कोविड, नोटबंदी आणि जीएसटीचा उल्लेख केला आहे. राहुल गांधी यांनी म्हटलं आहे की, हॉवर्डच्या बिजनेस स्कूलमध्ये भविष्यात अपयशाच्या केस स्टडी म्हणून हे शिकवलं जाईल.

आणखी वाचा- राहुल गांधी डिफेन्सशी संबंधित बैठकींना गैरहजर, पण प्रश्न विचारायला पुढे – भाजपा

राहुल गांधी यांनी ट्विट करताना नरेंद्र मोदींचा व्हिडीओही शेअर केला आहे. या व्हिडीओ नरेंद्र मोदी देशाला संबोधित करताना करोना व्हायरसविरोधातील लढाई २१ दिवसांमध्ये जिंकू असं सांगत आहेत. व्हिडीओत करोनाविरोधातील लढाईला १०० पेक्षा जास्त दिवस झाले असून भारत जागतिक देशांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असल्याचंही दाखवण्यात आलं आहे.

आणखी वाचा- ठरलं! भाजपाच्या ‘या’ नेत्याला मिळणार प्रियंका गांधींचा बंगला

करोनाचं संकट आल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं होतं. त्यावेळी सुरुवातीला २१ दिवसांचा लॉकडाउन जाहीर करण्यात आला होता. लोकांना नियमांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. पण लॉकडाउनला तीन महिने पूर्ण झाल्यानंतरही अद्याप परिस्थिती नियंत्रणात नाही. सध्या देशात जवळपास सात लाख करोनाचे रुग्ण असून १९ हजारापेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे.