करोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेला कर्फ्यू हटवण्याचा निर्णय पंजाब सरकारने घेतला आहे. मात्र यावेळी लॉकडाउन कायम ठेवण्यात येणार आहे. पंजाब सरकारने राज्यात लॉकडाउन ३१ मे पर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने लोकांना लॉकडाउनचा कालावधी वाढवण्यात आला असल्याने प्रशासनाला सहकार्य करावं अशी विनंती केली आहे.

मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी १८ मे पासून लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरु होताना लोकांना दिलासा देणाऱ्या काही घोषणा केल्या जातील असं सांगितलं आहे. लोकांना सहकार्य केल्याशिवाय सरकारची योजना यशस्वी होऊ शकत नाही असंही अमरिंदर सिंग यांनी सांगितलं आहे. पंजाबमधील सर्व शहरांना दिलासा देण्यात येणार आहे जेणेकरुन व्यवसाय-उद्योग सुरु व्हावेत. ज्या ठिकाणी करोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत ते परिसर आणि रस्ते सील करण्यात येणार आहेत. ही राज्य सरकारची नवी योजना असून १८ मे पासून त्याची अमलबजावणी होणार आहे.

शनिवारी संध्याकाळी जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी या घोषणा केल्या. सध्या पंजाबमध्ये करोनाचे ६५७ रुग्ण आहेत. तीन रुग्ण ऑक्सिजन सपोर्टवर आहेत. तर एकाची प्रकृती गंभीर असून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. पंजाबमध्ये करोनामुळे आतापर्यंत ३२ जणांचा मृत्यू झाला आहे.