करोनाच्या विषाणूंचा फैलाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळलं जावं असं वारंवार सांगितलं जात आहे. पण सोशल डिस्टन्सिंग ठेवताना सहा फुटांचं अंतर ठेवल्यानंतरही करोनाची लागण होण्याची भीती आहे. कारण खोकल्याने किंवा शिंकल्याने करोनाचे विषाणू जवळपास २० फुटांपर्यंत जाऊ शकतात असं एका संशोधनात समोर आलं आहे. संशोधकांना वेगेवगळ्या वातावरणात खोकणे, शिंकणे तसंच श्वास सोडताना निघणाऱ्या थेंबांचा अभ्यास केला असून एक मॉडेल तयार केलं आहे. यानुसार थंड आणि दमट हवामानात करोनाच्या विषाणूंचा फैलाव तीन पट वेगाने होऊ शकतो. पीटीआयने यासंबंधी वृत्त दिलं आहे.
तैवानमधील नॅशनल सन यात-सेन युनिव्हर्सिटीचे चिया वँग आणि सॅन दियागोमधील कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीचे किम्बर्ली प्रादर व डॉ. रॉबर्ट स्कूली या संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, खोकताना किंवा शिंकताना निघणारे थेंब २० फुटांपर्यंत प्रवास करत करोनाचा फैलाव करु शकतात. यामुळे सध्या सोशल डिस्टन्सिंगमध्ये सहा फुटांचं अंतर ठेवलं जावं असं सांगणारा नियम करोनाला ऱोखण्यासाठी पुरेसा नसल्याचं समोर आलं आहे.
गेल्या काही अभ्यासांच्या आधारे संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, खोकणे, शिंकणे इतकंच नाही तर सामान्यपणे बोलताना जवळपास ४० हजार थेंब बाहेर पडू शकतात. हे थेंब प्रती सेकंद काही मीटरपासून ते १०० मीटरपर्यंत प्रवास करु शकतात. जुन्या संशोधनांच्या आधारे संशोधकांनी सांगितलं आहे की, थेंबांची वायुगती, उष्णता आणि वातावरणासोबत होणाऱ्या बदलांमधील प्रक्रिया विषाणूंचा प्रभाव किती होईल हे ठरवतं.
संशोधनात सांगण्यात आलं आहे की, मोठे थेंब गुरुत्वाकर्षणमुळे एखाद्या गोष्टीवर साचून राहतात. पण छोटे थेंब एरोसोल कण तयार कऱण्यासाठी वेगाने बाष्पीभवन करतात. हे कण व्हायरसचा फैलाव करण्यात सक्षम असतात आणि अनेक तास हवेत राहतात.
मास्क घातल्याने विषाणूंची लागण होण्याचा धोका कमी होतो असंही संशोधकांनी सांगितलं आहे. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करुन विषाणूंची लागण होण्याचा धोका टाळता येऊ शकतो असंही ते म्हणाले आहेत. मोठ्या थेंबांमधून विषाणूंचा प्रसार होण्याचं अंतर कमी असतं. हे विषाणू नष्ट होण्याआधी एखाद्या गोष्टीवर साचून राहतात. पण जर हे विषाणू एखाद्या व्यक्तीच्या शरीरावर साचले तर मात्र चेहऱ्याला हात लावण्याने, डोळे चोळल्याने विषाणू शरिरात जाऊ शकतात. पण सोशल डिस्टन्सिंग पाळत हे टाळलं जाऊ शकतं असं संशोधकांनी सांगितलं आहे. करोनाच्या पॅटर्नचा अभ्यास अद्यापही संशोधक करत असून त्याबद्दल ठोस असा निष्कर्ष अजून निघालेला नाही.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 28, 2020 9:46 am