दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नायब राज्यपालांनी राज्य सरकारचा आदेश रद्द करुन दिलेल्या नव्या आदेशाचं पालन केलं जाईल असं आश्वासन दिलं आहे. हे मतभेद करण्याचे, तसंच राजकारण करण्याची वेळ नाही असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे. करोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर विलगीकरणात असणाऱ्या अरविंद केजरीवाल यांनी आज दिल्लीतील जनतेशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

“अनेक पक्ष आपापसात लढताना दिसत आहेत. जर आपण असेच लढत राहिलो तर करोनाचा विजय होईल. सर्वसामान्य माणूस जो टीव्हीवर बातम्या पाहत असतो तो सर्व पक्षांना लढताना पाहून हे काय सुरु आहे म्हणत असेल ? जोपर्यंत आपण एकत्र येऊन लढणार नाही तोपर्यंत करोनाचा पराभव करणं अशक्य आहे. सर्व राज्य, संस्था, लोकांनी एकत्र येणं गरजेचं आहे,” असं अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं आहे.

सोमवारी दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी राज्य सरकारचा दिल्लीमधील रुग्णालयं फक्त दिल्लीकरांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय रद्द केला होता. तसंच फक्त लक्षणं असणाऱ्या रुग्णांचीच चाचणी करण्याचा निर्णयही रद्द केला होता. लक्षणं नसणारे तसंच हाय रिस्क कॉन्टॅक्ट असणाऱ्यांचीही चाचणी करण्याचा आदेश त्यांनी दिला आहे.

आणखी वाचा- करोनाचं संकट, ‘या’ राज्यात झाली पहिल्या मृत्यूची नोंद

“दिल्ली निवडणुकीत आम्ही ६२ जागा जिंकल्या आहेत. केंद्राने निर्णय घेतला आहे आणि आता त्यावर आक्षेप घेण्यात अर्थ नाही. त्यासाठी ही योग्य वेळ नाही. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचं आणि नायब राज्यपालांनी दिलेल्या आदेशाचं तंतोतंत पालन केलं जाईल. यावर कोणताही वाद आणि चर्चा होणार नाही,” असं अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं आहे.

“जर राजकीय पक्ष भांडत बसले तर करोनाचा विजय होईल. संपूर्ण देशाने एकत्र येऊन लढण्याची गरज आहे. आपण किती मोठ्या संकटात आहोत याचा तुम्हाला अंदाजही नाही,” असं अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं आहे. पण करोना रुग्णांना बेड्स पुरवणे खूप मोठं आव्हान असल्याचं अरविंद केजरीवाल यांनी यावेळी सांगितलं आहे. जुलै अखेरपर्यंत दिल्लीत साडे पाच लाख करोना रुग्ण असतील असा दिल्ली सरकारचा अंदाज आहे.

आणखी वाचा- करोना रुग्णांची संख्या वाढल्यानं ‘या’ राज्यानं केल्या सीमा बंद

“दिल्लीत बेड्सची कमतरता भासू नये यासाठी मी मैदानं, हॉटेल अशा अनेक ठिकाणचा दौरा करणार आहे. बेड्स उपलब्ध व्हावेत यासाठी जे काही करावं लागेल ते सर्व मी करणार आहे,” असा निर्धारच अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केला आहे.