केरळमध्ये आठ वर्षाच्या मुलाने आपल्या पाच मैत्रिणींना अटक करण्याची मागणी केल्याची अजब घटना समोर आली आहे. महत्त्वाचं म्हणजे या पाच मुलींपैकी एक त्याची मोठी बहीण आहे. सगळ्या मुली आपल्याला वारंवार चिडवत असून सोबत खेळत नाहीत अशी तक्रार मुलाने पोलिसांकडे केली आहे. आठ वर्षाचा मुलगा अटकेची मागणी करत असल्याने काही वेळासाठी पोलीसही चक्रावले.

“मी मुलगा असल्याने त्या सगळ्याजणी माझी मस्करी करतात. त्या मला लुडो, बँडमिंटन, चोर-पोलीस खेळायला सोबत घेत नाहीत,” अशी तक्रार मुलाने पोलिसांकडे केली आहे. उमर निदार असं या मुलाचं नाव आहे. उमरने आपल्या वडिलांकडे तक्रार केली होती. त्यावेळी त्यांनी मस्करीत पोलीस ठाण्यात जा आणि तक्रार कर असं म्हटलं होतं. त्यानंतर मुलाने खरंच पोलीस स्टेशन गाठलं. मुलींपैकी एक त्याची बहिण असून इतर मुली नातेवाईक आणि शेजारी राहणाऱ्या आहेत.

लॉकडानमुळे आपल्या मित्रांसोबत खेळायला मिळत नसल्याने उमर आधीच चिडला होता. पोलिसांनी उमरला घेऊन त्याच्या घरी गेले आणि प्रकरण मिटवलं. पोलिसांनी मुलींना उमरला खेळण्यासाठी सोबत घ्या असं समजावून सांगितलं.

पोलीस कर्मचारी परिसरात एका तक्रारीचा तपास करण्यासाठी गेले असता तिसरीत शिकणाऱ्या उमरने त्यांच्याकडे एक कागद सोपवत मला तक्रार करायची असल्याचं सांगितलं. रात्र झाली असल्याने पोलिसांनी उमरला आम्ही उद्या येतो असं सांगून निघून गेले. दिलेला शब्द पाळत ते दुसऱ्या दिवशी आले आणि नेमकं काय झालं आहे याची विचारणा केली.

यावेळी उमरने आपण किती वेळा या मुलींना मला खेळायला सोबत घ्या सांगितलं, पण त्या नकार देतात अशी तक्रार केली. त्यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर पोलिसांनी मुलींना उमरला खेळण्यासाठी सोबत घ्या असं समजावलं. उमरच्या बहिणीने तो पोलिसांकडे तक्रार करेल असं अजिबात वाटलं नव्हतं असं म्हटलं आहे.