खोट्या बातमीमुळे निर्माण झालेल्या भीतीपोटी लॉकडाउनच्या काळात स्थलांतरित मजुरांकडून मोठ्या प्रमाणात स्थलांतर करण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाकडून संसदेत देण्यात आली आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदार माला रॉय यांनी विचारलेल्या प्रश्नावर केंद्रीय गृह राज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी उत्तर देताना ही माहिती दिली. माला रॉय यांनी लॉकडाउनच्या काळात हजारो मजूर आपल्या घरी जाण्याची कारणं विचारली होती.

प्रश्नाचं उत्तर देताना जी किशन रेड्डी यांनी सांगितलं की, “लॉकडाउनचा कालावधी वाढण्यासंबंधीच्या खोट्या बातमीमुळे भीती निर्माण झाली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात मजुरांनी स्थलांतर केलं. लोक आणि खासकरुन स्थलांतरित मजूर अन्न, पिण्याचं पाणी, आरोग्य सेवा, निवारा अशा मुलभूत गोष्टींमुळे चिंतेत होते. केंद्र सरकारला या सर्वाची जाणीव होती त्यामुळेच लॉकडाउनच्या काळात कोणत्याही नागरिकाला मुलभूत गरजांपासून वंचित राहावं लागू नये यासाठी योग्य उपाययोजना करण्यात आल्या”.

यावेळी खासदार माला रॉय यांनी अजून एक प्रश्न विचारत स्थलांतर करताना किती जणांचा मृत्यू झाला अशी विचारणा केली. यावर जी किशन रेड्डी यांनी केंद्राकडे यासंबंधी डेटा उपलब्ध नसल्याचं म्हटलं. लॉकडाउनच्या काळात अनेकांचा मृत्यू झाला होता ज्यामुळे देशभरात संताप व्यक्त करण्यात येत होता. मानवाधिकार आयोगानेही याची दखल घेत केंद्राला पाऊलं उचलण्यास सांगितलं होतं.

केंद्रीय गृहमंत्रालयाने यावेळी करोनाचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून करण्यात आलेल्या महत्त्वाच्या उपाययोजनांची माहिती दिली. यामध्ये स्थलांतरित मजुरांच्या सुरक्षेचाही मुद्दा होता.

२१ मार्च २०२० पासून केंद्रीय गृहमंत्रालयाच्या कंट्रोल रुमवरील कामाचा भार वाढवत सेवा २४ तास उपलब्ध करुन देण्यात आली. अनेक महत्त्वाच्या मंत्रालयांमधील प्रतिनिधी तसंच सह-सचिव पदाचे अधिकारी यावर लक्ष ठेवून होते. अडकलेल्या सर्व व्यक्तींची यामध्ये स्थलांतरित मजूरांचाही समावेस होता त्यांना तात्काळ मदत पोहोचवली जात होती अशी माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देण्यात आली.