देशात करोनाने थैमान घातलं असून लॉकडानमध्येही परिस्थिती अद्याप नियंत्रणात आलेली नाही. देशावर अद्यापही करोनाचं संकट कायम असून रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) नोव्हेंबर महिन्याच्या मध्यावधीमध्ये देशातील करोना रुग्णांची संख्या उच्चांक गाठण्याची शक्यता आहे अशी माहिती दिल्याचं वृत्त होतं. पण आयसीएमआरने हे वृत्त चुकीचं असून आपण अशी कोणतीही माहिती दिली नसल्याचं स्पष्ट केलं आहे. आयसीएमआरने हा दावा फेटाळणारं ट्विट केलं आहे.

ट्विटमध्ये आयसीएमआरने स्पष्ट केलं आहे की, “आयसीएमआरचा उल्लेख देत देण्यात आलेलं वृत्त चुकीचं आहे. आयसीएमआरकडून यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही”.

काय होतं वृत्त ?
नोव्हेंबर महिन्याच्या मध्यावधीमध्ये देशातील करोना रुग्णांची संख्या उच्चांक गाठण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशात आयसीयू बेड व व्हेटिंलेटर्सचा तुटवडा जाणवू शकतो. भारतीय संशोधन परिषदेनं (आयसीएमआर) एका अभ्यास गटाच्या माध्यमातून पाहणी केली, त्यातून ही गोष्ट समोर आली असल्याचं वृत्त होतं. पीटीआयने हे वृत्त दिलं होतं.