जागतिक आरोग्य संघटनेनं (डब्यूएचओ) बुधवारी जारी केलेल्या एका इशाऱ्यामध्ये युरोपीयन देशांमध्ये करोनाचा प्रादूर्भाव वाढत असल्याचं म्हटलं आहे. डब्यूएचओने नाताळ साजरा करताना लोकांनी मास्क घातलं नाही आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले नाहीतर तर युरोपीयन देशांमध्ये करोनाचे संकट अधिक गंभीर होऊ शकतं, असंही म्हटलं आहे. लोकांनी नाताळानिमित्त चर्चमध्ये जाताना किंवा पार्ट्यांना जाताना मास्क नाही घातले तर नवीन वर्षामध्ये करोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन रुग्णसंख्येचा विस्फोट झाल्याचे पहायला मिळू शकतं असा धोक्याचा इशाराही डब्ल्यूएचओनं दिला आहे. मात्र वाढती लोकसंख्या असोसिएट फ्री प्रेसने म्हटलं आहे. मात्र डब्यूएचओच्या या इशाऱ्याआधीच वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन लॉकडाउनचे निर्बंध लागू केलेत.

नक्की वाचा >> …तर २०२१ च्या सुरुवातीलाच करोना रुग्णसंख्येचा विस्फोट होईल; WHO चा इशारा

जर्मनीमध्ये पुन्हा कठोर निर्बंध आणि लॉकडाउन

करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याने जर्मनीमध्ये बुधवारपासून लॉकडाउनचे कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी दुकाने, शाळा पुन्हा बंद करण्यात आली आहेत. जर्मनीमधील रोग नियंत्रण केंद्र असणाऱ्या रॉबर्ट कीच या संस्थेच्या अहवालानुसार जर्मनीमध्ये मागील सात दिवसांमध्ये प्रती एक लाख लोकांमागे करोनामुळे दगावलेल्यांची संख्या १७९.८ इतकी आहे. हा आकडा मागील आठवड्यापेक्षा खूप अधिक आहे. जर्मनीमध्ये आतापर्यंत २३ हजार ४२७ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. ऑक्टोबरमध्ये करोनाचे रुग्ण वाढू लागल्यानंतर जर्मनीत काही प्रमाणात लॉकडाउन लागू करण्यात आला होता. मात्र आता रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागल्याने लॉकडाउनचे नियम कठोर करण्यात आलेत.

नेदरलँड्समध्ये पाहुणे आल्याचंही कळवावं लागणार

नेदरलँड्समध्येही पाच आठवड्यांच्या लॉकडाउनची घोषणा करण्यात आलीय. पंतप्रधान मार्क रुट यांनी यासंदर्भातील घोषणा केली असून सध्या तरी करोनावर परिणामकारक उपाय दिसत नसल्याने लॉकडाउनशिवाय पर्याय नसल्याचं म्हटलं आहे. पुढील पाच आठवडे नेदरलँड्समधील दुकाने, शाळा, व्यायामशाळा आणि अनेक सार्वजनिक ठिकाणं बंद राहणार आहेत. १९ जानेवारीपर्यंत कोणत्याही प्रकारची सूट मिळण्याची अपेक्षा ठेऊ नये असंही सराकरकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

भविष्यामध्ये परिस्थिती आणखीन हाताबाहेर जाऊ नये अशी आमची इच्छा असल्याने आम्हाला हे कठोर निर्णय घ्यावे लागत आहे. कोणाच्याही घरी पुढील काही काळासाठी जास्तीत जास्त दोन पाहुण्यांना जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच या पाहुण्यांबद्दलही स्थानिक प्रशासनातील अधिकाऱ्यांना आधीच माहिती देणं बंधनकारक करण्यात आलं आहे. नेदरलँड्स सरकार २४ ते २५ डिसेंबर म्हणजेच नाताळाच्या काळात काही सूट देईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ब्रिटनमध्ये सूट देण्याची मागणी जोर धरु लागली

ब्रिटनममध्ये नाताळाच्या कालावधीमध्ये करोनासंदर्भातील निर्बंधांमध्ये सूट देण्यासाठी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यावर दबाव वाढत असल्याचं चित्र दिसत आहे. अनेक नेत्यांनी तसेच अनेक बड्या चर्चेच्या प्रतिनिधींनी पंतप्रधानांकडे निर्बंधांमध्ये सूट देण्याची मागणी केली आहे. लोकांना नाताळ मोकळेपणे साजरा करता यावा यासाठी सूट देण्याची मागणी केली जात आहे.