News Flash

लॉकडाउनमुळे कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना वाढल्या; क्रमवारीत महाराष्ट्र-बिहार एकाच स्थानी

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांनी दिली माहिती

करोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी सरकारनं लॉकडाउनचा पर्याय निवडला. त्यामुळे सगळ्यांना घरात बंदिस्त करून घ्यावं लागलं. लॉकडाउनच्यानिमित्तानं संपूर्ण कुटुंब एकत्र आलं. एकमेकांसोबत वेळ घालवतांच्या कुटुंबाचे अनुभव सोशल मीडियातून झळकले. पण, आता लॉकडाउनमुळे आणखी एक बाब समोर आली आहे. २४ तास घरातच राहावं लागत असल्यानं घरातील कुरबुरी वाढल्या आहेत. लॉकडाउन सुरू झाल्यानंतर देशभरात कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारी वाढल्या आहेत, असं राष्ट्रीय महिला आयोगानं म्हटलं आहे. या यादीत बिहार आणि महाराष्ट्रातील तक्रारींची संख्या सारखीच आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी याविषयी माहिती दिली. शर्मा म्हणाल्या, ‘महिला आयोगाकडे सध्या ई-मेल द्वारे जास्त तक्रारी येत आहेत. मार्चच्या पहिल्या आठवड्यात (२ ते ८ मार्च) आयोगाकडे देशभरातून महिला हिंसाचाराच्या ११६ तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर लॉकडाउनच्या कालावधीत हा आकडा दुपटीनं वाढला आहे. पहिल्या दिवसांशी तुलना केल्यास (२३ ते ३१ मार्च) लॉकडाउनच्या कालावधीतील दहा दिवसात २५७ तक्रारी आयोगाकडं दाखल झाल्या आहेत,’ अशी माहिती शर्मा यांनी दिली.

“२४ मार्च ते १ एप्रिल या काळात राष्ट्रीय महिला आयोगाकडं कौटुंबिक हिंसाचाराच्या ६९ तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. या तक्रारींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. विशेष म्हणजे मला स्वतःला अशा तक्रारींचे ई-मेल येत आहेत. दररोज एक दोन तक्रारी माझ्याकडं येत आहेत. काही दिवसांपूर्वी मला नैनीतालमधील महिलेची तक्रार आली आहे. लॉकडाउनमुळे तिला तिच्या दिल्लीतील घरी जाणं अवघड झालं आहे. दुसरीकडं तिचा पती मारहाण करून छळ करत आहेत. ही महिला सध्या पोलीस ठाण्यातही जाऊ शकत नाही. सासरकडून होत असलेल्या छळ ती सहन करत आहे,” असं शर्मा म्हणाल्या.

कोणत्या राज्यातून किती तक्रारी?

शर्मा यांनी राज्यनिहाय आलेल्या तक्रारींची संख्याही यावेळी सांगितली. कौटुंबिक हिंसाचाराच्या सर्वाधिक तक्रारी उत्तर प्रदेशातून आल्या आहेत. ९० तक्रारी महिला आयोगाला प्राप्त झाल्या आहेत. त्यापाठोपाठ दिल्ली ३७, बिहार १८, महाराष्ट्र १८, मध्य प्रदेश ११ अशा तक्रारी आल्या आहेत. लॉकडाउन होण्याआधीच्या काळात उत्तर प्रदेश ३६, दिल्ली १६, बिहार ८, मध्य प्रदेश ४ आणि महाराष्ट्रातून ५ तक्रारी दाखल करण्यात आल्या होता. तक्रारींचे हे आकडे दहा दिवसांच्या कालावधीतील आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2020 10:05 am

Web Title: coronavirus lockdown in india domestic violence abuse complaints rise in coronavirus lockdown bmh 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 Coronavirus: भारतात करोनाग्रस्तांचा आकडा पोहोचला ३,३७४वर, ७७ जणांचा मृत्यू
2 Coronavirus: भारतात ८३ टक्के करोनाग्रस्त ६० वर्षांखालील – आरोग्य मंत्रालय
3 राष्ट्रपतींनीही दिली मोदींच्या आवाहनाला साद, गडकरी, जावडेकरांच्या हातीही दिवे
Just Now!
X