देशातील करोनाबाधितांची संख्या १४ हजार ३७८ वर पोहोचली आहे. तसंच मृतांची संख्या ४८० वर पोहोचली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. दरम्यान जगभरातील करोनाबाधितांची संख्या २२ लाख ३१ हजार ४३८ वर पोहोचली आहे. दुसरीकडे महाराष्ट्रात करोनाबाधितांची संख्या तीन हजारांच्या पुढे गेली असून हा टप्पा गाठणारं महाराष्ट्र पहिलं राज्य ठरलं आहे. महाराष्ट्रात करोनाबाधांची संख्या ३ हजार ३२० इतकी झाली आहे. शुक्रवारी राज्यात १८ नवे रुग्ण आढळले. तर दिवसभरात ७ रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत ३३१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शुक्रवारी ज्या सात रुग्णांचा मृत्यू झाला त्यातील पाचजण मुंबईचे तर दोघेजण पुण्यातले होते.

शुक्रवारी आरोग्य मंत्रालयाने माहिती देताना सांगितलं होतं की, “करोनाची रुग्णवाढ मंदावली आहे. टाळेबंदीपूर्वी दर तीन दिवसांनी रुग्णसंख्या दुप्पट होत होती. गेल्या सात दिवसांमधील आकडेवारीनुसार हे प्रमाण आता ६.२ दिवसांवर आले आहे”. करोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८० टक्के तर मृत्यूचे प्रमाण २० टक्के असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अगरवाल यांनी दिली.

रुग्णांची संख्या दुप्पट होण्याच्या राष्ट्रीय सरासरीपेक्षा १९ राज्यांमध्ये हे प्रमाण कमी असल्याचे आढळले आहे. त्यात महाराष्ट्राचा मात्र समावेश नाही. मात्र, दिल्ली, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, पंजाब या राज्यांचा समावेश आहे. महाराष्ट्राप्रमाणे या सर्व राज्यांमध्येही करोनाचे रुग्ण इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहेत. नव्या रुग्णांचे प्रमाण ४० टक्क्यांनी कमी झाले आहे. ताप आलेल्या व्यक्ती तसेच, फुप्फुसाशी निगडीत आजार असलेल्या व्यक्तींच्या नमुना चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात आल्याने करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात मदत झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.