देशभरात करोना व्हायरसचा थैमान सुरू असल्याने केंद्र सरकारने 21 दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली आहे. बहुतांश ठिकाणी लॉकडाउनचं पालन केलं जातंय, पण अनेक भागांमध्ये विनाकारण लॉकडाउनच्या नियमांचं उल्लंघन केल्याच्या घटना समोर येत आहेत, अशांवर पोलिसांकडून कारवाईही केली जातेय. दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून(JNU) अशीच एक घटना समोर आली आहे. येथे एक विद्यार्थी लॉकडाउनमध्ये बाहेर जाण्याचा हट्ट करत होता. गेटवरील सुरक्षारक्षकांनी त्याला रोखल्यानंतर, “मला करोना आहे, मी खोकलेल आणि करोना पसरवेन” अशी धमकी त्याने दिली. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी विद्यार्थ्याविरूद्ध एफआयआर दाखल केला आहे.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, प्रणव मेनन असे आरोपी विद्यार्थ्याचे नाव आहे. एक एप्रिल रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास प्रणव युनिव्हर्सिटीच्या ‘नॉर्थ गेट’वर आला. तो बाहेर जाण्याचा हट्ट करत होता. पण, गेटवरील सुरक्षारक्षकांनी त्याला कोणीही बाहेर जाऊ शकत नाही असे सांगितल्यावर तो तिथेच खाली बसला.

सुरक्षारक्षकांनी प्रणवला उठवण्याचा प्रयत्न केला असता, “मला करोना आहे… मी खोकलेल आणि करोना पसरवेन” अशी धमकी त्याने दिली. त्यानंतर प्रणवची सुरक्षारक्षकांसोबत झटापट झाली. त्याने सुरक्षारक्षकांचे मास्कही काढले. अखेर बळजबरीने त्याला आतमध्ये पाठवण्यात आले. नंतर, JNU च्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.